‘जनता जनार्दन’वर पोलीस सतर्क, आत्मदहन रोखण्यासाठी मंत्रालयाच्या गेटवर पाण्याची पिंपे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
  • राजेश चुरी

आपल्या विविध मागण्यांसाठी मंत्रालयाच्या बाहेर येऊन आत्महत्या-आत्मदहन करण्याचे प्रकार गेल्या चार पाच वर्षांत वाढीला लागत आहेत. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी प्रवेशद्वारासमोर अंगावर ज्वालाग्राही पदार्थ ओतून आत्मदहन करण्याचे प्रकार घडले आहेत. भविष्यात दुर्दैवाने आत्मदहनाचे प्रकार घडल्यास तातडीच्या वैद्यकीय उपायांचा एक भाग म्हणून जनता जनार्दन गेट म्हणून ओळखल्या जाणाऱया मुख्य प्रवेशद्वारावर पाण्याची पिंपे ठेवण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.

धर्मा पाटील यांच्या आत्महत्येनंतर मंत्रालयात किंवा प्रवेशद्वारावर येऊन आत्मदहन-आत्महत्या करण्याचे प्रयत्न वाढीला लागले आहेत. तीन वर्षांपूर्वी बीडमधील राधाबाई साळुंखे या महिलेने मंत्रालयाबाहेर अंगांवर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. दोन वर्षांपूर्वी असाच प्रकार मध्यंतरी मंत्रालयाच्या जनता जनार्दन गेटसमोर घडला होता भीमा-कोरेगाव दंगलप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्या अटकेच्या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्याने अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. कर्जबाजारी झालेल्या धाराशीवमधील एका व्यापाऱयाने मागील मंत्रालयाच्या गेटवर अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. नगरमधील अविनाश शेटे यांनी मध्यंतरी मंत्रालयात अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 2017 मध्ये मंत्रालयाबाहेर 101 जणांनी आत्महत्येच्या धमकीचे पत्र दिले होते, तर जानेवारी 2018 मध्ये मंत्रालयात 31 जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र त्यानंतरची आकडेवारी उपलब्ध होऊ शकली नाही.

मजबूत जाळीचा पर्याय

फेब्रुवारी 2018 मध्ये हर्षल रावते यांनी पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती.  मंत्रालयाच्या वरच्या मजल्यावरून खाली उडी मारून आत्महत्या करण्याचे प्रयत्न रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पहिल्या मजल्यावर मजबूत जाळ्य़ा लावण्यात आल्या. त्याचा पुढे फायदा झाला.  मागील वर्षी डिसेंबर महिन्यात प्रियांका गुप्ता या महिलेने मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. पण सुरक्षा जाळी लावल्याने महिलेचा जीव वाचला. मागील जानेवारीत ‘प्रजासत्ताक भारत’ या संघटनेच्या कार्यकर्त्यानेही मंत्रालयाच्या वरच्या मजल्यावरून खाली उडी मारली. पण सुरक्षा जाळी लावल्याने या तरुणाचे प्राण वाचले.

पत्राची वेळीच दखल घ्या

मंत्रालयाबाहेर आत्महदन-आत्महत्यांचे वांरवार होणारे प्रयत्न लक्षात घेऊन राज्याच्या पृषी विभागाने सप्टेंबरमध्ये परिपत्रक जारी केले होते. काही व्यक्ती आत्महत्येच्या धमकीची पत्रे देतात, पण या पत्रांची वेळीच दखल न घेतल्याने अनुचित प्रकार घडतात. त्यामुळे अशा पत्रांची वेळीच दखल घेण्याचे आदेश पृषी विभागाने दिले आहेत.