
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोलारा वनक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात वनरक्षक महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच रविवारी बिबट्याच्या हल्ल्यात पोलीस निरीक्षकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जिल्ह्यातील बल्हारपूर येथे घडली.
अविनाश पडोळे असे मृत पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. चंद्रपूरला दुचाकीने जात असतांना बल्हापूर-चंद्रपूर मार्गातील पॉवर हाऊस जवळ बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला.
बल्हारपूर शहरातील महाराणा प्रताप वॉर्डातील अविनाश पडोळे हे चंद्रपूर पोलीस स्टेशन येथे पोलीस उप निरीक्षक पदावर कार्यरत होते. बल्हारपूर- मार्गावरील पॉवर हाऊस जवळ अचानक बिबट्याने त्यांच्या दुचाकीवर झेप घेतली. अचानक झालेल्या या हल्याने ते गोंधळले. दुचाकीवरील नियंत्रण सुटले अन पडोळे मार्गावर कोसळले.
यात त्यांना गंभीर दुखापत झाली. जखमी अवस्थेत त्यांना बल्हारपूर ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. त्यांनंतर पडोळे यांना जिल्हा रूग्णालयात पुढील उपचारासाठी नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या दुदैवी घटनेमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.























































