
तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत निर्माण करणाऱ्या पाचजणांच्या गुन्हेगारी टोळीला नगर जिह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. तोफखाना पोलीस ठाण्याने पाठवलेल्या प्रस्तावाला जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी मंजुरी दिली आहे.
टोळीप्रमुख कुणाल ऊर्फ सनी अनिल कांबळे (24), गौरव राजेंद्र गायकवाड (21), अमोल हिरामण गायकवाड (20), स्वप्नील सुनील पारधी (23), अभिषेक ऊर्फ घाऱ्या दिलीप लोणारे (20, सर्व रा. नीलक्रांती चौक, नगर) अशी हद्दपार केलेल्यांची नावे आहेत.
जमाव जमवून दंगा करणे, घातक शस्त्र बाळगणे, विनयभंग, मारहाण, जीवे मारण्याचा प्रयत्न, दरोडा अशा गंभीर स्वरूपाचे आठ गुन्हे या टोळीने केले आहेत. त्यामुळे या टोळीला नगर जिह्यातून दोन वर्षांकरिता हद्दपार करावे, असा प्रस्ताव तोफखाना पोलीस ठाण्याने जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील यांच्याकडे पाठविला होता. या प्रस्तावाला अधीक्षक पाटील यांनी मंजुरी दिली आहे. तोफखाना पोलिसांनी या सराईत गुन्हेगारांना शिरूर (जि. पुणे) या ठिकाणी सोडल्याची माहिती तोफखान्याचे पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळुंके यांनी दिली.
‘संघटित’सह इतरही गुन्हे
टोळीप्रमुख कुणाल कांबळे अन्य चार साथीदारांच्या मदतीने तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत संघटित गुन्हेगारी करीत होता. कांबळे टोळीविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात संघटितपणे एकूण पाच दखलपात्र स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. याशिवाय टोळीप्रमुख कांबळे व टोळी सदस्य यांनी त्यांच्या इतर साथीदारांच्या मदतीनेही आठ गुन्हे केले असल्याची माहिती तोफखाना पोलिसांनी दिली.


























































