
कारवाई न करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेताना सदर बझार पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याला पोलीस ठाण्यातच अटक करण्यात आली आहे. सर्जेराव शंकर पाटील असे अटक केलेल्याचे नाव आहे.
तक्रारदाराविरोधात सदर बझार पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रार अर्ज दाखल आहे. तक्रारदारावर कारवाई न करण्यासाठी पोलीस नाईक सर्जेराव पाटील याने 10 हजार रुपयांची लाच मागितली होत़ी तडजोड होऊन पाच हजार रुपये देण्याचे ठरले. यातील पहिला हप्ता 2 हजार रुपये ठरला होता. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती.
पोलीस स्टेशनमध्येच पोलीस नाईक पाटील याला तक्रारदाराकडून दोन हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.



























































