बेसॉल्ट स्टोनची पायवाट, दर्जेदार बाक, अत्याधुनिक दिवे आणि झाडांचे संरक्षण!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बेसॉल्ट दगडाची पायवाट, दर्जेदार बाक व्यवस्था, अत्याधुनिक दिवे, आकर्षक बसथांबे, कचरापेटी, प्रीकास्ट काँक्रिट प्लांटर्स, दिशादर्शक फलक, झाडांचे संरक्षण अशा सुविधा असणारी अत्याधुनिक फुटपाथ रुईया कॉलेज ते वडाळा स्टेशनदरम्यान तयार करण्यात येणार आहे. पालिकेच्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे भूमिपूजन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. शिवसेना नगरसेवक अमेय घोले यांच्या पाठपुराव्यातून हे काम करण्यात येत आहे.

मुंबईला स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यात येत आहेत. यामध्ये पदपथ-वाहतूक बेटांचे सौंदर्यीकरणही करण्यात येत आहे. या उपक्रमात नगरसेवक अमेय घोले यांच्या नगरसेवक निधीतून 24 कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. यामध्ये एफ/उत्तर विभागातील लेडी जहांगीर रस्त्याच्या सुशोभिकरणाचे सौंदर्यीकरण करण्यात येत आहे.

यातील वडाळा स्टेशन ते डॉ. फडके चौक (रुईया चौक) आणि चेंबूर येथील सुशोभिकरणाचा शुभारंभ आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार राहुल शेवाळे, आमदार प्रकाश फातर्पेकर, तुकाराम काते, अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू, उपायुक्त हर्षद काळे, विश्वास शंकरवार, उपायुक्त राजन तळकर, सहायक आयुक्त गजानन बेल्लाळे, विश्वास मोटे आदी मान्यवर उपस्थित होते.

50 वर्षे टिकणारा फुटपाथ

पदपथ सौंदर्यीकरण उपक्रमात फरसबंदी, बसण्यासाठी काँक्रिट बाक, कचरापेटय़ा, बसस्टॉप, पादचारी क्रॉसिंगसाठी आयलँड, प्रवेशासाठी  ड्रॉप कर्ब आणि टॅक्साइल फरसबंदी रँप अत्याधुनिक पद्धतीने तयार करण्यात येणार आहे.

दोन्ही बाजूला 3.86 किमी लांबीचा हा फुटपाथ 40 ते 50 वर्षे टिकेल अशा अत्याधुनिक आणि दर्जेदार पद्धतीने बनवण्यात येणार आहे. फुटपाथवर झाडांची सावली, शोभेची झाडे लावण्यात येणार आहेत. सुमारे 15 महिन्यांत हे काम पूर्ण होईल.