धुरकं, प्रदूषण नव्हे तर मुंबईवर पसरतेय धुक्याची चादर!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई शहरावर सध्या गेले दोन तीन दिवस सकाळी धुक्याची चादर पसरायला लागली आहे. अनेकांना ते धुरंक म्हणजे धूर आणि धुकं यांचं मिश्रण असल्याचं वाटत आहे. पण, असं नसून खरोखर ती धुक्याचीच चादर असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

गेले काही दिवस मुंबईवर सकाळच्या वेळी दाट धुकं दिसून येत आहे. सामान्यतः शहरांमध्ये आढळणाऱ्या धुक्याला धुरकं म्हटलं जातं. कारण, ते धूर आणि धुक्यापासून तयार होतं. ते प्रकृतीसाठी हानिकारक असतं. पण, सध्या मुंबईवरची ही दुधाळ रंगाची दुलई धुक्याचीच असल्याचं मत मीटरोलॉजिस्ट अर्थात हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

हे धुकं उत्तरेकडून येणारे गार वारे आणि मुंबईच्या सागरी पट्ट्यातील आर्द्र वारे यांच्या मिश्रणातून तयार झालं आहे. याचसोबत हळूहळू मुंबईत थंडीची चाहूल लागेल, असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. सोमवारपर्यंतचा एक्यूआय अर्थात हवेच्या गुणवत्तेचा स्तर हा समाधानकारक असल्याचंही हवामान तज्ज्ञांचं म्हणणं आहे.