
कोरोना प्रतिबंधक लसीकरणात ठाणे जिह्याने आज विक्रम केला. सायंकाळी 5.30 वाजता जिह्याने एक कोटी डोसेसचा टप्पा ओलांडला. त्यामुळे आतापर्यंत एकूण 1 कोटी 36 हजार 496 ठाणे जिल्हावासीय लसवंत झाले आहेत. या विक्रमी कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आरोग्य यंत्रणेचे अभिनंदन करीत लसीकरणाला अधिक गतिमान करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
ठाणे जिह्यात आतापर्यंत 60 लाख 61 हजार 448 नागरिकांना पहिला डोस तर 39 लाख 75 हजार नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. ठाणे जिह्याने काही दिवसांपासून लसीकरणात आघाडी घेतली आहे. जिह्यात रोज 450 ते 500 लसीकरण केंद्रांवरून दिवसाला सरासरी 50 हजार नागरिकांचे लसीकरण केले जात आहे.
सध्या पहिला डोस न घेतलेल्या लाभार्थ्यांची संख्या ठाणे जिह्यात जास्त आहे. मात्र दुसरा डोस घेणाऱयांची संख्या ही राज्याच्या सरासरीपेक्षाही अधिक आहे. दुसरा डोस घेणाऱयांची संख्या सरासरी 47.84 टक्के असून ठाणे जिह्याची सरासरी 52.15 टक्के इतकी असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली. लसीकरणाचा वेग अजून वाढवण्याच्या सूचना जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱयांना दिल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
बुस्टर डोसचा आज फैसला
तिसऱया लाटेचा धोका वाढल्याने नागरिकांना कोरोना लसीचा बुस्टर डोस देण्याच्या तयारीला गती मिळाली आहे. केंद्र सरकारने विषाणू संसर्ग नियंत्रणासंबंधी नेमलेल्या तज्ञांच्या समितीची शुक्रवारी महत्त्वाची बैठक होणार आहे. देशात बुस्टर डोस कधीपासून व सुरुवातीला कोणाला द्यायचा, याबाबत बैठकीत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. अलीकडेच ‘डीसीजीआय’ने सिरम इन्स्टिटय़ूटला बुस्टर डोससाठी परवानगी दिली आहे.
































































