
लोकशाही मार्गाने निवडून येऊन एक हुकूमशहा आपल्या देशावर राज्य करत असून, ‘वन मॅन शो’ सुरू आहे. केंद्र सरकारचे कधी मोदी सरकार झाले हे समजलेच नाही. ही देशासाठी सर्वात घातक गोष्ट आहे. ब्रिटिश ‘डिव्हाईड ऍण्ड रुल’ या पद्धतीने काम करत होते. तर आत्ताचे सरकार ‘डायव्हर्ट ऍण्ड रुल’ या पद्धतीने काम करत आहे. भाजप ही देशासाठी समस्या बनली आहे. या समस्येवर तात्पुरता तोडगा न काढता त्यावर कायमस्वरूपी उपाय काढला पाहिजे. आगामी काळात केंद्र सरकार विरुद्ध जनता अशी लढाई बघायला मिळेल, असे स्पष्ट मत काँग्रेसचे युवा नेते कन्हैया कुमार यांनी व्यक्त केले.
पुणे पत्रकार संघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या वार्तालापामध्ये कन्हैया कुमार बोलत होते. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष मंगेश कोळपकर, सरचिटणीस डॉ. सुजित तांबडे उपस्थित होते.
शेतकऱयांपुढे 56 इंचाची छाती झुकली
केंद्र सरकारने शेतकऱयांच्या विरोधात लागू केलेले कृषी कायदे रद्द करण्यासाठी शेतकऱयांनी मजबुतीने लढा दिला. त्यांच्या लढय़ाला यश आले असून, केंद्राने हे कायदे रद्द केले. शेतकऱयांच्या समोर 56 इंचाची छाती झुकली, असे कन्हैया कुमार म्हणाले.
प्रभू श्री रामचंद्रांबाबत प्रश्न विचारला असता, प्रभू श्री रामचंद्रांना माझा अजिबात विरोध नाही. मात्र, काहीजण त्याआडून त्यात नथुराम घुसवणार असतील, तर ते खपवून घेतले जाणार नाही, असे मत कन्हैया कुमार यांनी व्यक्त केले.
भिकेत फक्त पुरस्कार मिळू शकतात
अभिनेत्री कंगना राणावत हिने हिंदुस्थानला स्वातंत्र्य भिकेमध्ये मिळाले असल्याचे वादग्रस्त विधान केले होते. त्यावर कन्हैया कुमार म्हणाले की, देशाला मिळालेल्या स्वातंत्र्यामध्ये अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. त्याग, समर्पण, बलिदान याशिवाय स्वातंत्र्य मिळत नसते. भीक म्हणून केवळ पुरस्कार मिळू शकतात, असा टोलाही कन्हैया यांनी लगावला.

































































