नगर एमआयडीसीतील सनफार्मा कंपनीला आग, एका कामगाराचा होरपळून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर एमआयडीसीतील सनफार्मा कंपनीला बुधवारी रात्री भीषण आग लागली. या आगीत एका कर्मचाऱयाचा होरपळून मृत्यू झाला. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेबाबतची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक युवराज आठरे यांनी दिली.

रावसाहेब कडू महागडे (वय 52, रा. चेतना कॉलनी, नवनागापूर, मूळ रा. संभाजीनगर) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. महिनाभरापूर्वी दिवाळीत नगर जिल्हा शासकीय रुग्णालयातील आयसीयू विभागाला आग लागून 14 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच एमआयडीसीतील सनफार्मा कंपनीला लागलेल्या आगीने खळबळ उडाली आहे.

मनपाच्या अग्निशमन विभागाच्या दोन, एमआयडीसीच्या दोन व राहुरी नगर परिषदेची एक अशा पाच अग्निशमन गाडय़ा पाचारण करण्यात आल्या होत्या. अग्निशमन पथकाने केलेल्या अडीच तासांच्या परिश्रमानंतर रात्री साडेअकरा वाजता ही आग आटोक्यात आली. या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आगीची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक अजित पाटील, पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीत जखमी झालेले रावसाहेब महागडे यांना उपचारार्थ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वी त्यांचे निधन झाले. नागापूर एमआयडीसीच्या प्रवेशद्वाराजवळच सन फार्मा कंपनी असून, कंपनी आवारात वेगवेगळे प्लाण्ट असून, एका प्लाण्टला आग लागली होती.