
पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी पुन्हा दणका देत शहरातील पोलीस निरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या केल्या आहेत. सदर बाजार ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील यांची नियंत्रण कक्षात बदली केली असून, सलगरवस्ती ठाण्याच्या निरीक्षक अश्विनी भोसले यांच्याकडे चार्ज दिला आहे. इंद्रजित वर्धन यांना सलगरवस्तीचा चार्ज दिला आहे. आयुक्तांच्या निर्णयाने खळबळ उडाली आहे.
दोनच दिवसांपूर्वी सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन गटांत दगडफेक झाली होती. तसेच सदर बाजार ठाण्यातील पोलीस सर्जेराव पाटील यांना लाच घेताना अटक केली होती. त्यामुळेच निरीक्षक कमलाकर पाटील यांची बदली होणार अशी चर्चा होती.
ऑर्केस्टा बार प्रकरणाकरून विजापूरनाका ठाण्याचे निरीक्षक उदयसिंह पाटील यांना निलंबित केले आहे. त्यांचे निलंबन रद्द झाले असून, त्यांची शहर सायबर ठाणे येथे नियुक्ती झाली आहे. सहायक निरीक्षक कोल्हाळ यांनाही निलंबित केले आहे. फौजदार चावडी ठाण्यातील दीपक बरडे यांची नियंत्रण कक्षात, पीएसआय नागेश म्हात्रे यांची सदर बाजार पोलीस ठाण्यात नियुक्ती केली आहे. एपीआय संजय क्षीरसागर यांचीही बदली झाली आहे.































































