‘ओमायक्रॉन’ 59 देशांमध्ये पसरला, हिंदुस्थानमध्ये 25 रुग्ण; ‘या’ गोष्टी ठरतायंत धोकादायक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचा नवा व्हेरिएंट ‘ओमायक्रॉन’ (Omicron) जगभरात वेगाने पसरत आहे. आतापर्यंत जगातील 59 देशांमध्ये या व्हेरिएंटचे रुग्ण आढळले आहेत. हिंदुस्थानमध्येही याचा धोका वाढत चालला असून आतापर्यंत 25 रुग्ण आढळले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली.

देशात ओमायक्रॉन व्हेरिएंटचे पहिले दोन रुग्ण कर्नाटकमध्ये आढळले होते. यानंतर महाराष्ट्र, राजस्थानमध्ये या व्हेरिएंटची लागण झालेले रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत देशातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 25 झाली आहे. तर जगभरातील 59 देशांमध्ये पसरलेल्या या व्हेरिएंटची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 2936 वर पोहोचली आहे, असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले.

ओमायक्रॉन व्हेरिएंटचा पहिला रुग्ण दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळला होता. 24 नोव्हेंबर रोजी ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण दक्षिण आफ्रिकेच्या गोटेंग प्रातात आढळला होता. हा व्हेरिएंट वेगाने पसरू लागल्याने 26 नोव्हेंबरला जागतिक आरोग्य संघटनेने याला धोकादायक कॅटेगरीमध्ये टाकले. त्यानंतर जगभरातील देश सतर्क झाले. अनेक देशांनी विमान उड्डाणांवर बंदी घातली तर अनेकांनी विमानतळावर आरटीपीसीआर चाचणीसाठी कक्ष उभारले.

जगभरात सध्या ओमायक्रॉनची लागण झालेले 2936 रुग्ण आहेत. यातील सर्वाधिक 817 रुग्ण यूकेमध्ये आहेत, तर डेन्मार्कमध्ये 796 रुग्ण सापडले आहेत. ज्या दक्षिण आफ्रिकेत याचा पहिला रुग्ण आढळला होता तेथील रुग्णांची संख्या 431 आहे. तसेच कॅनडामध्ये 78, अमेरिकेत 71, जर्मनीत 65, दक्षिण कोरियात 60, ऑस्ट्रेलियात 52, झिम्बाब्वेत 50, फ्रान्समध्ये 42, पोर्तुगालमध्ये 37, नेदरलँडमध्ये 36, नॉर्वेत 33, घानामध्ये 33, बेल्झियममध्ये 30 आणि हिंदुस्थानमध्ये 25 रुग्ण आढळले आहेत.

‘या’ गोष्टी ठरतायंत धोकादायक

ओमायक्रॉनचा धोका वाढत असताना नागरिकांनी अधिक सजग राहण्याची आवश्यकता आहे. असे असतानाही हिंदुस्थानमध्ये मास्कचा वापर सातत्याने कमी होत आहे. लस आणि मास्क हे दोन्ही महत्त्वाचे आहे. मास्कच्या वापरात घट होणे हे चित्र धोकादायक आहे. जागतिक परिस्थितीवरून आपण शिकले पाहिजे, असे डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले.