एकच लक्ष्य… 100 टक्के व्हॅक्सिनेशन, मुंबईत लसीकरणासाठी ‘नाइट शिफ्ट’!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईचे 100 टक्के लसीकरण पूर्ण करण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून आता रात्री 10 वाजेपर्यंत तर काही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत लसीकरण केले जाणार आहे. पाच प्रभागांपासून या उपक्रमाची सुरुवात होत आहे. त्यामुळे दुसरा डोस बाकी असलेल्या 20 टक्के लाभार्थ्यांसह मुंबईचे लसीकरण जानेवारीअखेरपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

मुंबईत 16 जानेवारी रोजी लसीकरण सुरू झाल्यापासून सद्यस्थितीत पालिका, राज्य सरकार आणि खासगी मिळून 451  केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. यामध्ये 12 डिसेंबरपर्यंत 1 कोटी 70 लाख 53 हजार 19 डोस देण्यात आले आहेत. यामध्ये 18 वर्षांवरील पात्र असलेल्या सुमारे 94 लाख जणांचा पहिला डोस घेऊन पूर्ण झाला आहे, तर 80 टक्के जणांनी दुसरा डोसही घेतला आहे. असे असले तरी कोरोना व्हेरिएंट ओमायक्रोन धोक्याच्या पार्श्वभूमीवर वेगाने लसीकरण पूर्ण करण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून कार्यवाही करण्यात येत आहे.

…म्हणूनच घेतला निर्णय

कोरोना लसीकरणाबाबत काही जणांच्या मनात असलेल्या गैरसमजांमुळे तर काही जण दिवसभर कामावर असल्याने डोस घेऊ  शकत नाहीत. या पार्श्वभूमीवर पालिकेने सुरू केलेल्या ‘हर घर दस्तक’ मोहिमेत घरोघरी जाऊन लसीकरण केले जाणार आहे.

यात लसीबाबत माहिती दिली जाणार असून गैरसमज दूर करून जनजागृतीही केली जाणार आहे. यात काही ठिकाणी रात्री 10 वाजेपर्यंत तर काही ठिकाणी आवश्यतेनुसार रात्री उशिरापर्यंत लसीकरण केले जाणार आहे.

मुंबईत कोरोना चांगलाच आटोक्यात असला तरी पूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठी नागरिकांनी पालिकेला आतापर्यंत दिलेल्या सहकार्याप्रमाणे यापुढेही सहकार्य केले पाहिजे. मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि वारंवार हात धुणे-सॅनिटायझेशन या त्रिसूत्रीचा अवलंब केला पाहिजे.

सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त