
पर्यावरणाच्या कारणास्तव खेड तालुक्यात कोणत्याही प्रकारच्या उत्खननाला शासनाने बंदी घातली आहे. मात्र शासनाच्या या आदेशाला धाब्यावर बसवून खेड मटण मार्केट येथील जगबुडी नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन केले जात असल्याने पाहावयास मिळत आहे.
विशेष म्हणजे अवैध उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार असलेली महसूल विभागाचे या उत्खननांकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने महसूलच्या वरदहस्ताखालीच हा गोरख धंदा सुरु आहे कि काय अशी शंखा उपस्थित केली जात आहे.
पर्यावरणाचा होणारा ऱ्हास रोखण्यासाठी काही वर्षांपूर्वी खेड तालुक्यात उत्खननाला बंदी घालण्यात आली. त्यामुळे तालुक्यातून वाहणाऱ्या जगबुडी नदीपात्रात केल्या जाणाऱ्या वाळू उत्खननावर निर्बंध आले. मात्र तरीही काहीजण निलिक, अळसुरे, खेड शहर या ठिकाणी वाळू उत्खनन करून त्या वाळूची वाहतूकही करत आहेत. शासनाची रॉयल्टी बुडवून अशा प्रकारे वाळू उत्खनन करणे हा कायद्याने गुन्हा आहे.
महसूल तसेच खनिकर्म विभागाने अशा व्यवसायिकांवर कारवाई करणे गरजेचे आहे मात्र महसूल किंवा खनिकर्म विभागाकडून अशा व्यावसायिकांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना पाठीशी घातले जात असल्याने खाडीपात्रात अवैध वाळू उत्खन करून वाळूचे बिनबोभाटपणे वितरणही केले जात आहे.
खेड तालुक्यातून वाहणाऱ्या जगबुडी नदीपात्रात ठिकठिकाणी वाळू उत्खनन केले जाते. रात्रीच्या काळोखाचा फायदा घेत हा गोरख धंदा केला जातो. पूर्णपणे अवैध असलेल्या या व्यवसायातून लाखो रुपयांची उलाढाल केली जाते. खेड शहरातील मटण मार्केट आणि अळसुरे, निलिक परिसरात सुरु असलेले अवैध वाळू उत्खनन तात्काळ थांबबावे अशी मागणी पर्यावण प्रेमी करत आहेत.























































