मेडिकल कव्हर देण्याच्या बहाण्याने रत्नागिरीत 97 हजारांची फसवणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्या ऑनलाईन गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. रत्नागिरीत मेडिकल कव्हर देण्याचा बहाण्याने एका व्यक्तीची 97 हजाराची फसवणूक करण्यात आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या क्रेडीटकार्ड विभागातून बोलत असून तुम्हाला अडीच हजार रुपयांचे मेडिकल कव्हर मिळाले आहे. तुम्ही तुमच्या क्रेडीट कार्डचा वापर केला नाही म्हणून आम्ही तुमचे अडीच हजार रुपये रिफंड करतोय, असे सांगत मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी नंबर फोनवर बालणाऱ्या महिलेने मागितला. त्या ओटीपीद्वारे त्या महिलेने 97 हजार 290 रुपये त्या व्यक्तीच्या क्रेडीट कार्डमधून काढून घेत त्याची फसवणूक केली.

कांचन रामचंद्र चाळके (वय 54, रा. लोटे) यांनी खेड पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दाखल केली आहे. कांचन चाळके यांच्या मोबाईलवर एका अनोळखी महिलेने संपर्क केला. मी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या क्रेडीटकार्ड विभागातून बोलत आहे. तुम्हाला अडीच हजार रुपयांचे मेडिकल कव्हर मिळाले असून तुम्ही तुमच्या क्रेडीट कार्डचा वापर केला नाही म्हणून आम्ही तुमचे अडीच हजार रुपये रिफंड करतोय असे सांगून चाळके यांचा विश्वास महिलेने संपादन केला. त्यानंतर चाळके यांच्या मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी घेत त्यांच्या क्रेडीटकार्डवरुन टप्प्याटप्प्याने 97 हजार 290 रुपये काढून घेत चाळके यांची फसवणूक केली.