‘बाहुबली’प्रभासचा मराठमोळा शिक्षक! चंद्रपूरचा आशीष पाथोडे अभिनयासह देतोय भाषेचे प्रशिक्षण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मंगेश दराडे  

चित्रपटनिर्मिती हे टीमवर्क आहे. चित्रपट तयार करताना कलाकारांची जेवढी मेहनत असते तितकीच पडद्यामागे काम करणाऱ्या कलाकारांचीसुद्धा मेहनत महत्त्वाची असते. ‘बाहुबली’ स्टार प्रभासच्या आगामी ‘आदिपुरुष’ या चित्रपटाची आतापासूनच जोरदार चर्चा आहे. या चित्रपटासाठी प्रभाससह इतर कलाकारांना अभिनय आणि भाषेचे प्रशिक्षण देण्याचे काम चंद्रपूरचा आशीष पाथोडे या तरुणाने केले आहे. विशेष म्हणजे, आशीषचे काम पाहून प्रभासने आगामी ‘राधे श्याम’ आणि ‘प्रोजेक्ट के’ या चित्रपटांत आपला प्रशिक्षक म्हणून काम करण्याचीदेखील संधी त्याला दिली आहे.

चंद्रपूर जिह्यातील नागभीडजवळच्या बोथली या खेडेगावातील आशीषला लहानपणापासून अभिनयाची आवड. पुण्यातील ललित कला अकादमीतून आशीषने अभिनयाची पदवी घेतली. त्यानंतर दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून त्याने पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. मुंबईत आल्यावर सुरुवातीच्या काळात त्याने चित्रपट आणि मालिकांमध्ये लहानमोठय़ा भूमिका साकारल्या. त्यानंतर हळूहळू बॉलीवूड कलाकारांचा प्रशिक्षक म्हणून काम करायला त्याने सुरुवात केली. ‘बॅन्जो’, ‘ठाकरे’, ‘तान्हाजी’, ‘अझर’, ‘ढिशूम’ अशा अनेक चित्रपटांसाठी त्याने अभिनय प्रशिक्षक म्हणून काम केले आहे.

‘आदिपुरुष’विषयी तो म्हणाला, ‘तान्हाजी’नंतर ओम राऊत यांनी ‘आदिपुरुष’मध्ये काम करण्याची संधी मला दिली. रामायणावर आधारित हा भव्यदिव्य चित्रपट आहे. पौराणिक सिनेमा असल्याने यात संस्कृतप्रचुर हिंदी आहे. शब्दांचे उच्चारण कसे करावे, त्याला अनुसरून देहबोली कशी असावी याचा  रिसर्च करून कलाकारांकडून त्या पद्धतीने अभिनय करून घेण्याची जबाबदारी माझ्या खांद्यावर होती. चित्रपटाच्या मोशन कॅप्चरची धुरादेखील सांभाळली आहे. त्यामुळे हा माझा आतापर्यंतचा सर्वात स्पेशल प्रोजेक्ट आहे.

अत्यंत गुणी, शिस्तप्रिय विद्यार्थी

आजवर मी अनेक बॉलीवूड कलाकारांना अभिनयाचे धडे दिले आहेत. त्यामुळे प्रभासला प्रशिक्षण देताना मला कसलेही दडपण नव्हते. प्रभास हा माझा अत्यंत गुणी आणि शिस्तप्रिय विद्यार्थी आहे. पॅन इंडिया स्टार असतानाही आपल्या स्टारडमचा कुठलाही बडेजाव त्याने केला नाही.  सांगितलेल्या सूचनांचे त्याने तंतोतंत पालन केल्याचे आशीष सांगतो.

पुढे तो म्हणाला, माझे काम पाहून त्याने आणखी दोन चित्रपटासाठी पर्सनल प्रशिक्षक म्हणून माझी निवड केली. अभिनेता म्हणून तो ग्रेट आहे त्यापेक्षा माणूस म्हणून तो खूपच ग्रेट आहे. आपल्या माणसांची तो खूप काळजी घेतो. हैदराबादच्या ‘प्रोजेक्ट के’च्या शूटिंगवेळी रोज त्याच्या घरातून मला टिफीन यायचा. मुंबईत असताना मी त्याला टिफीन घेऊन जायचो. कोंकणी पद्धतीचे मासे आणि तांदळाची भाकरी त्याला खूप आवडते.