
मीडियाने रोहित शर्मा आणि माझ्यात मानापमाननाटय़ रंगत असल्याच्या कपोलकल्पित बातम्या पसरवल्या. मुळात माझ्या मनात वन डे संघाचा कर्णधार रोहितबद्दल कोणताही किंतु नाही आणि यापुढेही असणार नाही. त्याच्या-माझ्यातील वादाच्या वावडय़ा ऐकून गेली दीड वर्ष पार थकून गेलोय. आता बस झाली ही चर्चा, अशा शब्दांत टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहली याने बुधवारी पत्रकार परिषदेत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिका दौऱयावर प्रयाण करण्यापूर्वी कर्णधार विराट कोहीली पत्रकारांशी बोलत होता.
दक्षिण आफ्रिकेत वन डे मालिका खेळण्यासाठी आपण तयार आहोत आणि आतापर्यंत ज्या बातम्या पसरवल्या जात होत्या त्या पूर्णपणे चुकीच्या आहेत, असे सांगून विराटने कोहलीने मीडियात पसरलेल्या वृत्ताचे खंडन केले. तो म्हणाला, रोहित शर्माला वन डे संघाचा कर्णधार करण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयावर मला कोणतीही अडचण नाहीय. राष्ट्रीय निवड समितीच्या बैठकीच्या दीड तास आधी माझ्याशी संपर्क करण्यात आला. मुख्य निवडकर्त्याने कसोटी संघाबाबत चर्चा केली. त्यानंतर मीटिंग संपण्यापूर्वी मला सांगण्यात आले की, मी एकदिवसीय संघाचा कर्णधार होणार नाही आणि मला कोणतीही अडचण असणार नाही. मात्र यापूर्वी त्या निर्णयाबद्दल मला कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती, असेही विराटने स्पष्ट केले. विराट आणि रोहित शर्मामध्ये कर्णधारपदावरुन वाद सुरू असल्याच्या जोरदार चर्चा सुरु होत्या. त्यावर आता विराट कोहलीने प्रतिक्रिया दिली आहे.
बीसीसीआयने फेटाळला विराट कोहलीचा दावा
नवी दिल्लीः हिंदुस्थानच्या कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या पत्रकार परिषदेनंतर नवीन वादाला सुरुवात झाली आहे. ‘बीसीसीआय’ने विराट कोहलीचा दावा खोडून काढला आहे. सप्टेंबर महिन्यात बोर्डाच्या पदाधिकाऱयांनी विराट कोहलीशी चर्चा करून त्याला टी-20 चे कर्णधारपद सोडू नको अशी विनंती केली होती, अशी माहिती बीसीसीआय पदाधिकाऱयाने दिली. कर्णधारपदाच्या विषयाकर बीसीसीआयकडून संवादाचा अभाव होता, कल्पना दिली नाही हा विराटचा दावा बीसीसीआयने फेटाळून लावला आहे. टी-20 कर्णधारपदासह एकूणच सर्व विषयाकर विराटबरोबर चर्चा झाली होती. बैठकीच्या दिवशी सकाळी चेतन शर्मा यांनी विराटला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाबाबतच्या निर्णयाची माहिती दिली होती, असे बीसीसीआयकडून सांगण्यात आले आहे. एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हटवताना बीसीसीआयकडून संवादाचा अभाव होता असे कोहलीने बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यावर आता बीसीसीआयने प्रत्युत्तर दिले आहे.
मी टी-20 चे कर्णधारपद सोडू नये असे बोर्डाने कधीच म्हटले नाही
टी-20 कर्णधारपद सोडण्यापूर्वी मी बोर्डाशी बोललो होतो असे सांगून विराट म्हणाला, बोर्डानेही माझ्या म्हणण्याशी सहमती दर्शवली. मी टी-20 चे कर्णधारपद सोडू नये, असे बोर्डाने कधीच म्हटले नाही. मला कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये कर्णधारपद हवे होते आणि माझी बोर्डाशी चर्चा सुरू आहे असे मी म्हटले होते. बोर्डाचे अध्यक्ष सौरभ गांगुली म्हणाले होते की, आम्ही कोहलीला टी-20चे कर्णधारपद सोडू नको असे सांगितले होते.
‘‘कर्णधारपदावरून दूर केल्यावरही माझ्या फलंदाजीवर फारसा परिणाम होणार नाही. जेव्हा मी देशासाठी खेळतो तेव्हा माझे सर्वस्व देतो. असेच योगदान मी भविष्यात एकदिवसीय सामन्यांमध्ये देत राहणार आहे.’’
-विराट कोहली, टीम इंडियाचा कसोटी कर्णधार




























































