
कोरोनामुळे बंद असलेल्या मुंबईतील शाळा 20 महिन्यांनंतर पुन्हा गजबजल्या. मुंबईसह ठाणे, नवी मुंबईतील पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा आजपासून सुरू झाल्या. घंटा खणाणली आणि पाठीवर दप्तर घेऊन चिमुकल्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने शाळेत प्रवेश केला. ढोल-ताशे आणि लेझीमने त्यांचे स्वागत केले गेले. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी पायघडय़ा अंथरल्या गेल्या होत्या. दुतर्फा रांगोळ्या काढल्या गेल्या होत्या. बॅण्डच्या संगीतात गीत गाऊन विद्यार्थ्यांवर पुष्पवर्षाव केला गेला. नाताळ तोंडावर असल्याने सांताक्लॉजही त्यांना खाऊ घेऊन आला होता. पहिल्या दिवसाची सुरुवात अशी अविस्मरणीय झाली.
पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी दीड वर्षानंतर शाळा प्रत्यक्ष पाहिली. नेहमी ऑनलाइन वर्गात दिसणारे चेहरे समोरासमोर आले. खूप दिवसांनंतर शिक्षक, मित्रमैत्रिणींची भेट झाल्याने लहानग्यांच्या उत्साहाला उधाण आले होते. शाळेत प्रवेश करताच त्यांनी शिक्षकांना नमस्कार केला. कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन करत त्यांनी वर्ग गाठला.
शाळा सुरू होणार म्हणून वर्गांची आणि परिसराची स्वच्छता व निर्जंतुकीकरण करण्यात आले होते. वर्गात आल्यानंतर गोंधळ घालण्याचा अनेकांचा मूड होता, पण त्याचबरोबर कोरोना प्रतिबंधक नियमांचे बंधन असल्याने शिक्षक करीत असलेल्या सूचनांचे पालन करताना विद्यार्थी दिसत होते. वर्गांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचीही काळजी घेण्यात आली होती.
शाळांनी एकाच वेळी ऑफलाइन आणि ऑनलाइन वर्गही सुरू ठेवले होते. जे विद्यार्थी शाळेत हजर राहू शकले नाहीत त्यांनी ऑनलाइनद्वारे आपली उपस्थिती दर्शविली. खासगी शाळा पुढील तीन दिवस सुरू राहणार असून पुढील आठवडय़ापासून नाताळची सुट्टी सुरू होणार आहे. या सुट्टीनंतर कोरोनाची परिस्थिती सामान्य राहिल्यास वर्गातील उपस्थिती आणखी वाढेल, असा विश्वास शिक्षकांनी व्यक्त केला आहे.
विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनीही धरला ठेका
पहिली-दुसरीच्या विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनीही विविध बालगीतांवर ठेवा धरला. दररोज डिजिटल माध्यमासमोर बसून आभासी शाळा अनुभवणारे विद्यार्थी आज शारीरिक हालचाल करून जागेवरच उभे राहून नाचत-बागडत होते. कोरोना प्रतिबंधक नियमांमुळे शाळेत सामूहिक खेळांवर बंदी असली तरी विविध गाण्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा व्यायामही झाला. काही शाळा दररोज वर्ग सुरू होण्याआधी विद्यार्थ्यांमध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी असे उपाय करणार आहेत.
मुंबईत 1 लाख 81 हजार विद्यार्थ्यांची उपस्थिती
मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व माध्यमाच्या, बोर्डाच्या, खासगी प्राथमिक अनुदानित व विनाअनुदानित शाळा मिळून आज 92.28 टक्के शाळा सुरू झाल्या. एकूण शाळांपैकी 2246 शाळांमध्ये प्रत्यक्ष वर्ग भरले. तर 6 लाख 53 हजार 239 विद्यार्थ्यांपैकी 2 लाख 35 हजार 119 विद्यार्थ्यांच्या पालकांनी (36 टक्के) संमतीपत्र भरून दिले. त्यापैकी वर्गात 1 लाख 80 हजार 640 म्हणजे 77 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
- 21,310 शिक्षक, कर्मचाऱयांपैकी 20,212 जणांचे लसीकरण.
- विद्यार्थ्यांसाठी मास्क, थर्मल गन, पल्स ऑक्सिमीटरचा पुरवठा.
हळूहळू उपस्थिती वाढेल
पहिली ते चौथीचे 222 पैकी 162, तर पाचवी ते सातवीचे 61 पैकी 42 विद्यार्थी वर्गात हजर होते. येत्या काही दिवसांत शाळेतील हजेरीचा पट आणखी वाढेल. ’ – अंबरसिंग मगर, मुख्याध्यापक, एफ. जी. बर्वे नगर महापालिका शाळा






























































