घरासाठी बुधवारी गिरणी कामगारांचा मोर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लाखो गिरणी कामगार आजही हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे सरकारने त्यांना तत्काळ घरे द्यावीत, त्यांचे पुनर्वसन करावे या मागण्यांसाठी सर्व श्रमिक संघटनेच्या वतीने हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बुधवार, 22 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता आझाद मैदान ते विधिमंडळ असा मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामुळे या मोर्चात मुंबई, ठाणे परिसरातील गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

गिरण्या बंद करून जमिनी विकणाऱ्या मालकांनी कामगारांना घरे देणे बंधनकारक आहे. त्यानुसार 1 लाख 74 हजार 332 गिरणी कामगारांनी घरांसाठी अर्ज केलेले आहेत, मात्र आतापर्यंत केवळ 13 हजार 453 कामगारांनाच घरे मिळालेली आहेत. यावरून घरांपासून वंचित असलेल्या कामगारांची संख्या मोठी आहे. याबाबत सर्व श्रमिक संघटना सरकारकडे वारंवार पाठपुरावा करत असून सरकारही आश्वासने देत आहे, मात्र त्याची ठोस अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे कामगारांची अवहेलना थांबवून त्यांना न्याय द्यावा यासाठी मोर्चा काढण्यात येणार असल्याचे सर्व श्रमिक संघटनेच्या गिरणी कामगार विभागाचे अध्यक्ष बी. के. आंब्रे यांनी स्पष्ट केले आहे.