
मुंबईत कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आली असताना कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाणही घटले आहे. मुंबईत आज चौथ्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली. मुंबईसाठी ही दिलासादायक बाब ठरली आहे. मुंबईत गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर दररोजची मृत्युसंख्या थेट 50 हून जास्त नोंद झाली होती. त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले होते, मात्र पालिका आणि राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे सद्यस्थितीत कोरोना पूर्ण नियंत्रणात आला आहे. दैनंदिन रुग्णसंख्या आणि मृत्यूही घटले आहेत. याआधी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 17 ऑक्टोबर 2021 रोजी पहिल्यांदाच शून्य कोरोना मृत्यूची नोंद झाली होती. यानंतर फक्त डिसेंबरमध्ये आतापर्यंत तिसऱ्यांदा दिवसभरात शून्य मृत्यू नोंद झाले आहेत. डिसेंबरमध्ये 11 डिसेंबर आणि 15 डिसेंबर रोजी शून्य मृत्यू नोंदवले गेले होते.























































