शेअर बाजार धाडकन् कोसळला, 6.79 लाख कोटी बुडाले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रोनची दहशत जगभरात वाढत असल्यामुळे त्याचे हादरे अर्थव्यवस्थेला आणि आर्थिक व्यवहारांना बसत आहेत. सोमवारी मुंबई शेअर बाजारात अक्षरशः हडपंप होऊन सेन्सेक्स तब्बल 1190 अंकांनी कोसळला. याचा फटका गुंतवणूकदारांना बसला असून, काही तासांत तब्बल 6.79 लाख कोटी रुपये बुडाले.

शेअर बाजार सुरू होताच पडझडीला सुरुवात झाली. सेन्सेक्स 1190 अंकांनी कोसळला. बाजार बंद होताना सेन्सेक्स 55822 अंकांवर स्थिरावला होता. 26 ऑगस्टनंतरची ही सर्वाधिक घसरण आहे. यामुळे गुंतवणूकदारांना तब्बल 6 लाख 79 हजार कोटींचा फटका बसला. निफ्टीचा अंकही 371 ने कोसळून

16614 अंकांवर स्थिरावला.

  • सोमवारी तेल आणि वायू, वीज, बँकिंगसह सर्व सेक्टरच्या शेअर्समध्ये मोठी पडझड पाहायला मिळाली.
  • टाटा स्टिलचे शेअर सर्वाधिक 5.20 अंकांनी कोसळले. त्यानंतर इंडसइंड बँक, स्टेट बँक, बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक, कोटक बँक आणि एनटीसीसीच्या शेअरची मोठी पडझड झाली.
  • केवळ डॉ. रेड्डीज आणि एचयूएलचे शेअर 1.70 टक्क्यांनी वधारले.

प्रमुख कारणे

  • शेअर बाजारात मोठी घसरण होण्यामागे ओमायक्रोनचा जगभरात वाढणारा संसर्ग हे प्रमुख कारण असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.
  • ओमायक्रोनमुळे नववर्षाच्या सुमारास लॉकडाऊन लागण्याची भीती आहे. त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होण्यास सुरुवात झाली असून विदेशी गुंतवणूकदारांकडून शेअरची विक्री वाढली आहे.