बेस्टचे ‘चलो मोबाईल ऍप’, सुट्या पैशांची झंझट संपली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बेस्टच्या प्रवाशांची प्रवास करताना आता सुटे पैसे बाळगण्याची धास्ती संपणार आहे. मंगळवारपासून बेस्टने ‘चलो मोबाईल ऍप’ लाँच केले असून त्यामुळे बेस्टचा डिजिटल युगात प्रवेश झाला आहे. प्रवाशांना ‘चलो मोबाईल ऍप’ डाऊनलोड करावे लागणार असून त्यामुळे बस स्टॉपवर बस नेमकी कोणत्या वेळी पोहचेल याचे ‘लाइव्ह पोझिशन’ मोबाईलच्या क्रीनवर पाहायला मिळणार आहे. तसेच बेस्टच्या स्मार्टकार्डची सेवा सुरू होणार असून त्याद्वारेही तिकीट व पास खरेदी करता येणार आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ‘सह्याद्री’ अतिथीगृह येथे या सेवांचे आज लोकार्पण करण्यात आले.

‘चलो मोबाईल ऍप’द्वारे प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यास मदत होणार आहे. बसची सद्यस्थिती, बसमधील गर्दी आदी माहिती मोबाईलवर मिळणार आहे. बस प्रवासात रोख रकमेचा व्यवहार टाळण्यासाठी मोबाईल ऍपबरोबरच स्मार्टकार्डचेही लोकार्पण करण्यात आले. प्रत्यक्षात हे कार्ड 1 जानेवारीपासून प्रवाशांना मिळणार आहे, अशी माहिती बेस्ट उपक्रमाने दिली. या कार्यक्रमात बेस्ट समिती अध्यक्ष आशीष चेंबूरकर, सदस्य अनिल कोकीळ, सुनील अहिर, बबन कनावजे, राजेश ठक्कर, अनिल पाटणकर, दत्ता नरवणकर, अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार, पी. वेलरासू आणि बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र उपस्थित होते.

z महिलांसाठी, मागणीनुसार खासगी कार्यालय कर्मचाऱयांसाठी बेस्ट बस सुरू करण्यात आल्या आहेत. मुंबईत काही कार्यालये 24 तास सुरू असतात तेथे 24 तास बेस्ट सेवा देण्याचा विचार करा, असे यावेळी आदित्य ठाकरे यांनी बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र आणि अन्य अधिकाऱयांना सांगितले. पुण्यात हायड्रोजन सेल बस धावत आहेत. विजेवर धावणाऱया बसनंतर असा पर्यायही बेस्टने निवडावा, असेही ठाकरे म्हणाले.