
जगावर कोरोना, ओमायक्रोनचे संकट भिरभिरत आहे. उद्योगांना त्याचे प्रतिकूल परिणाम भोगावे लागत आहेत. अनेकांवर नोकऱया गमावण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीतही देशातील गुणवत्तेला मात्र जगभरात वाव मिळत आहे. पवई येथील आयआयटी मुंबईतील कॅम्पस प्लेसमेंटमध्ये 1382 विद्यार्थ्यांची नामवंत कंपन्यांनी आपल्याकडील जॉबसाठी नियुक्ती केली आहे. आयआयटी मुंबईसाठी हा विक्रमी आकडा आहे. तेथील विद्यार्थी अवघ्या 18 दिवसांत करोडपती बनले आहेत. विशेष म्हणजे प्लेसमेंटच्या पहिल्या टप्प्यात वेतनाचे सर्वाधिक पॅकेज 2 कोटी 87 लाख रुपये आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही आयआयटी संस्थांमधील कॅम्पस प्लेसमेंटच्या पहिल्या टप्प्याला 1 डिसेंबरपासून सुरुवात झाली. आयआयटी मुंबईत 1 ते 18 डिसेंबर या कालावधीत 315 कंपन्यांनी 1382 विद्यार्थ्यांची नियुक्ती केली. प्लेसमेंटच्या पहिल्या टप्प्यात इतक्या विद्यार्थ्यांना नोकऱयांच्या ऑफर्स मिळण्याचा आतापर्यंत हा विक्रम आहे.
वर्ष ऑफर्स
- 2019-20 1319
- 2020-21 1128
- 2021-22 1723
क्षेत्र सरासरी वार्षिक पॅकेज
- अभियांत्रिकी व इंजिनीयरिंग 21.54 लाख रुपये
- माहिती-तंत्रज्ञान, सॉफ्टवेअर 27.05 लाख रुपये
- अर्थ 28.40 लाख रुपये
- संशोधन आणि विकास 25.12 लाख रुपये
- सल्ला सेवा 18.02 लाख रुपये
देशातील नोकरीसाठी सर्वात मोठे पॅकेज 1.68 कोटींचे
देशातील नोकरीसाठी या वर्षी सर्वात मोठे वार्षिक पॅकेज 1.68 कोटी रुपयांचे तर परदेशातील नोकरीसाठी सर्वात मोठे पॅकेज 2.87 कोटी रुपयांचे आहे. सात विद्यार्थ्यांना एक कोटीपेक्षा जास्त रकमेचे आंतरराष्ट्रीय पॅकेज मिळाले तर देशांतर्गत नोकरीसाठी 5 विद्यार्थ्यांना एक कोटी रुपयांपेक्षा जास्त वार्षिक वेतनाची ऑफर मिळाली.
तंत्रज्ञान क्षेत्रातून सर्वाधिक ऑफर्स
आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातून सर्वाधिक ऑफर्स मिळाल्या. या वर्षी सार्वजनिक क्षेत्रातील दोन कंपन्याही प्लेसमेंटमध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यांच्याकडून 9 ऑफर्स मिळाल्या. आणखी काही सरकारी कंपन्याही प्लेसमेंटमध्ये सहभागी होऊ शकतात.
परदेशी नोकऱयांसाठी 45 विद्यार्थ्यांची निवड
45 विद्यार्थ्यांची अमेरिका, जपान, सौदी अरेबिया, सिंगापूर, नेदरलॅण्ड, हाँगकाँग आणि तैवान या देशांतील नोकऱयांसाठी नियुक्ती झाली. बाजार थंडावला असल्याने या वर्षी प्लेसमेंटमध्ये नव्या स्टार्ट-अप कंपन्यांना सहभागी होण्याचेही निमंत्रण देण्यात आले होते.



























































