मस्त आणि महामस्त, ‘सामना’चा अग्रलेख पुण्याच्या चौकाचौकांत झळकला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दैनिक ‘सामना’च्या बुधवारच्या अंकात ‘मस्त आणि महामस्त’ या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेला अग्रलेख पुण्यातील चौकाचौकांमध्ये झळकला आहे. या अग्रलेखाचे फ्लेक्स आज पुणेकरांचे आकर्षण बनले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुणे दौऱयावर असताना शिवसेनेवर केलेली टीका आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी ‘राष्ट्रपती राजवटी’बाबत केलेल्या विधानाचा खरपूस समाचार या अग्रलेखात घेण्यात आला होता.

पुण्यातील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात या अग्रलेखाचे मोठाले फ्लेक्स पहाटेपासूनच लोकांचे आकर्षण बनले होते. शिवसेना पुणे उपशहरप्रमुख प्रशांत राणे यांनी हे फ्लेक्स लावले होते. शिवाजीनगरातील बाजारपेठेत व्यापाऱयांनी आणि नागरिकांनी या अग्रलेखाचे स्वागत केले. वाचनप्रिय पुणेकरांना हा अग्रलेख इतका आवडला की, लोक रस्त्यावर गर्दी करून हा अग्रलेख वाचत होते. ‘मस्त’ अमित शहा आणि राज्यातील त्यांच्या ‘महामस्त’ चेल्यांची ‘सामना’ने चांगलीच खरडपट्टी काढल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत होती.