
कोरोना व्हेरिएंट ओमायक्रोनचा वाढलेला धोका आणि गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन रुग्णसंख्या वाढू लागल्याने पालिकेने मुलांच्या लसीकरणासाठी ‘ब्ल्यू प्रिंट’ तयार ठेवली आहे. यामध्ये 2 ते 18 वर्षांपर्यंतच्या मुलांच्या लसीकरणासाठी 250 केंद्रांवर व्यवस्था करण्यात येणार आहे. डोसची उपलब्धता आणि मुलांकडून मिळणारा प्रतिसाद यानुसार केंद्रांची आणि लसीकरणाची संख्या वाढवली जाणार आहे. 18 वर्षांखालील 35 लाख मुलांचे लसीकरण यामध्ये केले जाणार आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने लहान मुलांच्या लसीकरणासाठी कोवोव्हॅक्स लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी दिल्यामुळे पुण्याच्या सिरम इन्स्टिटय़ूटनेही 200 कोटी डोसचे उत्पादन करण्याचे जाहीर केले आहे. ‘डब्ल्यूएचओ’ची मंजुरी मिळाल्यामुळे आता ‘आयसीएमआर’ व केंद्राच्या मंजुरीनंतर तातडीने मुलांचे लसीकरण सुरू करण्याची तयारी पालिका प्रशासनाकडून करण्यात आली आहे. सद्यस्थितीत पालिकेच्या मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात 2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांवर लसीकरणाची ट्रायल सुरू आहे. ज्यांना या ट्रायल्समध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांनी 23027205 किंवा 23027204 या दूरध्वनी क्रमाकांवर संपर्क साधल्यास नोंदणी आणि मार्गदर्शन करण्यात येत आहे.
असे आहे पालिकेचे नियोजन
- आयसीएमआर, केंद्राकडून आदेश आल्यास तीन दिवस ते आठवडाभरात लसीकरण सुरू होईल.
- यासाठी कर्मचाऱयांना आवश्यक असणारे ट्रेनिंग तातडीने देण्यात येईल.
- लसींचा साठा करण्यासाठी पालिकेकडे कांजूरमार्गसह इतर ठिकाणी शीतगृह व्यवस्था आहे.
- पहिल्या, 28 व्या आणि 56 व्या दिवशी असे तीन डोस देण्यात येतील.
- लस दिल्यानंतर रिऍक्शन खबरदारीसाठी पेडियाट्रिक वॉर्डचा वापर करता येईल.
- लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी पालिका व्यापक प्रमाणात जनजागृती करेल.
मुंबईतील लसीकरणाची सद्यस्थिती
मुंबईत 18 वर्षांवरील सुमारे 94 लाख लाभार्थ्यांमधील सर्वांचा पहिला डोस पूर्ण झाला आहे. तर सुमारे 85 टक्के जणांनी दुसरा डोसही घेतला आहे. जानेवारी 2022 अखेर लसीकरण पूर्ण करण्याचे पालिकेचे उद्दिष्ट आहे. सद्यस्थितीत पालिका, खासगी आणि सरकारी अशा 451 केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. मुंबईत आतापर्यंत एकूण 1 कोटी 75 लाख 76 हजार 265 डोस देण्यात आले आहेत.


























































