
>> उत्तरा मोने
गेली 30 वर्षे निवेदनाच्या क्षेत्रात वावरताना प्रत्यक्ष रंगमंचावर उभं राहून एखाद्या कार्यक्रमाचं निवेदन करणं, समोर तुडुंब भरलेल्या प्रेक्षागृहात रसिकांचा प्रतिसाद घेत कार्यक्रम रंगवणं या सगळ्यातला आनंद वेगळाच होता, पण आता कार्यक्रम होणार नाहीत म्हटल्यावर मीदेखील डिजिटलकडे वळले. भव्यदिव्य कार्यक्रमांची व्याप्ती डिजिटल प्लॅटफॉर्मवर सांस्कृतिक कार्यक्रमाच्या बाबतीत आणता येत नाही, पण अगदी आपापल्या घरी राहूनही कलाकारांना प्रेक्षकांच्या भेटीला आणता येतं आणि कलाकार आणि प्रेक्षक यांच्यातलं नातं आपल्याला दृढ करता येऊ शकतं हेही लक्षात आलं.
गेल्या वर्षी 2020 च्या मार्च महिन्यात कोरोनामुळे लॉक डाऊन जाहीर झाला आणि इतर सगळ्या क्षेत्रांप्रमाणेच सांस्कृतिक क्षेत्रातही एक मोठा ‘पॉज’ आला. सगळे थांबले. एरवी आपला मराठी माणूस नाटक, सिनेमा, गाण्याचे कार्यक्रम याशिवाय राहू शकत नाही. पण आता मात्र या सगळ्या सांस्कृतिक गरजा घरबसल्या भागवायच्या होत्या. त्यामुळे टीव्हीवर दिसणारं मनोरंजन हा एकच पर्याय होता. पण त्यातच ओटीटी प्लॅटफॉर्मने मात्र चांगलाच जोर धरला. या प्लॅटफॉर्मनी आपला एक वर्ग तयार केला होता.
लॉक डाऊनच्या काळात या ओटीटी प्लॅटफॉर्मना खूपच उधाण आलं. नवीन मनोरंजन हवं म्हणून टीव्हीवरच्या वेगवेगळ्या चॅनल्सवर मालिका बघणारा वर्ग या ‘ओटीटी’च्या मालिकांकडे वळला. या सगळ्यामुळे मनोरंजनाची दुनिया आपल्या बोटाच्या एका क्लिकवर जवळ आली. सगळे चॅनल्स फेसबुक आणि युटय़ुब चॅनल्सकडे ही वळले आणि घरबसल्या सांस्कृतिक क्षेत्रातला आशय विषय तयार होऊ लागला. कार्यक्रम तयार होऊ लागले.
गेली 30 वर्षे निवेदनाच्या क्षेत्रात वावरताना प्रत्यक्ष रंगमंचावर उभं राहून एखाद्या कार्यक्रमाचं निवेदन करणं, समोर तुडुंब भरलेल्या प्रेक्षागृहात रसिकांचा प्रतिसाद घेत कार्यक्रम रंगवणं या सगळ्यातला आनंद वेगळाच होता, पण आता कार्यक्रम होणार नाहीत म्हटल्यावर मीदेखील डिजिटलकडे वळले. सुरुवातीला रोज संध्याकाळी एक गोष्ट सांगावी इथून या डिजिटल प्रवासाला सुरुवात झाली. त्याच अनुषंगाने अनेक डिजिटल कार्यक्रमांची मी सुरुवात केली. ज्यात सचिन खेडेकर, मृणाल कुलकर्णी, अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी, श्रेयस तळपदे अशा अनेक सुप्रसिद्ध कलाकारांनी प्रेक्षकांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या.
लॉक डाऊनमुळे अनेक व्यवसाय काही काळ बंद झाले. अशा वेळी उद्योजकांना भविष्याविषयी आशावादी राहण्यासाठी मार्गदर्शन मिळावं या हेतूने आम्ही यंगिस्तान हा ऑनलाईन बिझनेस एक्स्चेंज ग्रुप फेसबुकच्या माध्यमातून सुरू केला. अनेक यशस्वी उद्योजकांनी आणि आपले उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी या माध्यमातून लोकांना मार्गदर्शन केलं.
मनोरंजनाच्या या डिजिटल युगात कार्यक्रम स्थानिक न राहता आता जागतिक झाले आहेत. साता समुद्रापार असलेले प्रेक्षकदेखील हे कार्यक्रम अगदी सहज बघू शकतात, त्यात सहभागी होऊ शकतात. याचा खूप चांगला अनुभव मला आला, तो ‘श्रावण महोत्सव’ या आमच्या डिजिटल पाककला स्पर्धेच्या माध्यमातून. श्रावण महोत्सव ही पाककला स्पर्धा मी गेली 6 वर्षे सातत्याने महाराष्ट्रभरात घेते आहे. पण या वर्षी ही स्पर्धा डिजिटल माध्यमांद्वारे कशी घेता येईल याचा विचार करताना लक्षात आलं की, आपण ही स्पर्धा या वर्षी आंतरराष्ट्रीय पातळीवर करू शकतो आणि स्पर्धेसाठी देश – विदेशातून 2000 स्पर्धकांनी सहभाग घेतलासुद्धा. शिवाय या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे परीक्षकही आंतरराष्ट्रीय पातळीवरून, आपापल्या ठिकाणी राहून हे काम करू शकले.
या दिवसात अनेक कलाकारांनी आपले युटय़ूब चॅनल्स सुरू केले. फेसबुक लाइव्ह, इंस्टाग्रामच्या माध्यमातून प्रेक्षकांशी ते संवाद साधू लागले. यात स्पृहा जोशी हिने सुरू केलेली कवितांची मैफल असेल, मधुरा वेलणकर हिचा ‘मधुरव’ हा अभिवाचन आणि कविता वाचनाचा कार्यक्रम असेल किंवा सुलेखा तळवलकर हिचा युटय़ूबवरचा ‘दिल के करीब’ मुलाखतींचा कार्यक्रम असेल, निवेदिता सराफने सुरू केलेला रेसिपींचा चॅनल असेल, या प्रत्येक कार्यक्रमातून प्रेक्षकांचं घरबसल्या मनोरंजन झालं आणि आपल्या लाडक्या कलाकारांना त्यांना भेटता आलं.
पूर्वी रसिक ज्यासाठी तोबा गर्दी करायचे ते मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचं नाटकसुद्धा आता त्यांना डिजिटली पाहायला मिळत आहे. सुप्रसिद्ध लेखक, अभिनेता, दिग्दर्शक आणि आता निर्माता ऋषिकेश जोशी याने पाहिलं वाहिलं डिजिटल थिएटर सुरू करून नाटक ऑन नेट म्हणजेच ‘नेटक’ हा नवीन उपक्रम सुरू केला. अवघ्या दोन महिन्यांच्या काळात या नेटकचे 30 देशांत 55 प्रयोग झाले आणि कला क्षेत्रातल्या अनेक दिग्गजांनी या प्रयोगांचं कौतुकही केलं.
काही महिन्यांपूर्वी स्त्री आधार केंद्र, मुंबई मराठी पत्रकार संघ आणि महिला आर्थिक विकास महामंडळ या तीन संस्थांतर्फे आयोजित पहिल्या वहिल्या डिजिटल महिला साहित्य संमेलनाचं संयोजन आम्ही केलं. दोन दिवस झालेल्या या संमेलनात मराठी साहित्यातील लेखिकांच्या योगदानावर, साहित्यातील स्त्रियांच्या चित्रणावर चर्चा करणारे परिसंवाद सादर करण्यात आले. तसंच कवयित्री संमेलनदेखील सादर केलं गेलं. या संमेलनात 13 लेखिकांचा समावेश होता आणि संमेलनाच्या अध्यक्षा होत्या ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले आणि स्वागताध्यक्षा होत्या विधान परिषदेच्या उपसभापती मा. डॉ. नीलम गोऱ्हे. इतक्या वेगळ्या धाटणीचा वैचारिक कार्यक्रम डिजिटली सादर झाला आणि दोन्ही दिवस 20,000 हून अधिक रसिकांनी या संमेलनाचा घरबसल्या आनंद घेतला. त्याचप्रमाणे ‘अनुबंध’ ही एक नवी ऑनलाईन मालिका आम्ही केली. आई–वडील आणि मुलं यांच्यातलं मायेचं नातं उलगडणारी अशीही मालिका आहे. यात आपले लाडके कलाकार आणि त्यांची मुलं यांची मुलाखत आणि त्यांच्या नात्यातला गोडवा प्रेक्षकांसमोर उलगडता आला.
एकूणच गेल्या वर्षभरात सांस्कृतिक क्षेत्रात नवा डिजिटल प्रवाह आला आणि या क्षेत्रात मोलाची भरही घातली गेली. पण आता जेव्हा प्रत्यक्ष हॉलमधल्या, मैदानातल्या कार्यक्रमांना हळूहळू सुरुवात होते आहे. तेव्हा हा व्हर्च्युअल पडदा बाजूला सारून रंगमंचाचा पडदा उघडण्याची आस कलाकारांना नक्कीच आहे. तेव्हा आता म्हणायला हरकत नाही… पुनश्च हरीओम!




























































