आरोग्य : बालकांच्या कोरोना लसीकरणातील दुवे कच्चेच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. अविनाश भोंडवे

हिंदुस्थानात 100 टक्के लसीकरण करायचे असेल, तर अनेक अडचणी आणि त्रास दूर करावे लागतील. लहान मुलांची लस आणि त्यांचे लसीकरण ही प्रौढांच्या मोहिमेपेक्षा वेगळी आहे. त्यामुळे या लसीची तरी उपलब्धता योग्य नियोजन करून व्यवस्थित होणे आत्यंतिक गरजेचे आहे. 2 ते 18 वयोगटात कोट्यवधी बालकांच्या आणि किशोरांच्या या गटाच्या लसीकरणाचे शिवधनुष्य पेलणे सोपे ठरणार नाही. काटेकोर आणि योग्य नियोजन नसले तर एखाद्या अनुचित प्रसंगामुळे या गटाच्या लसीकरणाच्या मोहिमेला अपयशाचा जबरदस्त धक्का बसू शकतो.

देशाने 21 ऑक्टोबर रोजी एकूण 1 अब्ज नागरिकांच्या लसीकरणाचा टप्पा गाठला. सर्वत्र या घटनेचे मोठय़ा प्रमाणात स्वागत केले गेले. 16 जानेवारीपासून सुरू झालेल्या लसीकरणाद्वारे हा आकडा 9 महिने 5 दिवसात गाठला गेला. पण लसीकरणाच्या आकडेवारीचे विश्लेषण केले तर वेगळ्याच गोष्टी समोर येतात.

आजमितीला हिंदुस्थानची लोकसंख्या 139 कोटी आहे. म्हणजे संपूर्ण जनतेचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण होण्यासाठी एकूण 278 कोटी डोस दिले जाणे अपेक्षित आहे. 21 डिसेंबरपर्यंत यापैकी एकूण 138 कोटी 34 लक्ष डोसेस देऊन झालेत. म्हणजे अजून 140 कोटी डोस दिले जाणे आवश्यक आहे. यामध्ये 18 वर्षे वयाखालील लोकसंख्या अंदाजे 45 कोटी आहे. याचा अर्थ 32 टक्के लोकसंख्या अजूनही लसीकरणापासून केवळ वंचितच राहिलेली आहे तर त्याना लसवंत करण्याबाबत कमालीचे औदासिन्य आणि दिरंगाई आढळून येते. हिंदुस्थानातील लसीकरणाच्या निर्णयाबद्दल सर्व हक्क केंद्र सरकारच्या अखत्यारीत ठेवले गेले असल्याने, राज्यांच्या सरकारांना या वयोगटाच्या पालकांना द्यायला कोणतेही उत्तर नाही.

विविध उपलब्ध लसी

5 ऑक्टोबरला ‘कोव्हॅक्सिन’ या हिंदुस्थानी बनावटीच्या कोरोना प्रतिबंधक लसीला परवानगी देण्याबाबत केंद्रीय औषध मानक आणि नियामक संस्थेच्या (सीडीएससीओ) तज्ञ समितीने अनुकूलता दाखवली. काही अटींची पूर्तता करून लवकरच या लशीला 2-18 वयोगटासाठी मान्यता मिळेल असे जाहीरही झाले आहे.

यापूर्वी झायडस पॅडिला या हिंदुस्थानी कंपनीच्या ‘झायकॉव्ह’ या लसीला 12 ते 18 वर्षाच्या किशोरांसाठी मान्यता मिळालेली आहे. दरम्यान नोव्होव्हॅक्स या अमेरिकन कंपनीच्या ’कोव्हाव्हॅक्स’ या सिरम इन्स्टिटय़ूट बनवत असलेल्या लसीलाही 2 ते 18 वयोगटासाठी लवकरच मान्यता मिळण्याची शक्यता आहे.

थोडक्यात 2 ते 18 वयोगटातील शिशू, बालके, शाळकरी मुले आणि किशोरवयीन मुलामुलींसाठी एकीकडे लसी तयार होतायत, पण त्या टोचण्याची सुरुवात कधी होणार? या प्रश्नाबाबत केंद्रीय आरोग्य खात्याकडून अजूनही कोणतेही धोरण, रूपरेषा जाहीर झालेली नाही.

एकीकडे ओमायक्रोनचे संकट वाढतच चाललेले आहे. लसीकरण न झालेल्यांना या विषाणूचा संसर्ग लवकर होईल असेही सांगितले जाते आहे. गेल्या सहा महिन्यांपासून तिसरी लाट येणार आणि त्यात लहान मुले मोठय़ा प्रमाणात बाधित होणार असेही केंद्र सरकारकडून वारंवार सांगितले गेले. त्यासाठी राष्ट्रीय पातळीवर एक टास्क फोर्सदेखील स्थापन केला आहे, असे सांगण्यात आले. या वयोगटासाठीच्या लसींना मान्यता मिळून तीन महिने होत आले तरी त्याबाबतच्या धोरणासंबंधात अजूनही देश अंधारात आहेत.

या मुलांना लसीकरणाविना शाळेत कसे पाठवायचे? या विवंचनेत देशातील लक्षावधी पालक चिंतित आहेत. त्यांना दिलासा वाटेल असे कोणतेही मार्गदर्शन किंवा सूतोवाच केंद्रीय आरोग्य खात्याने केलेले नाही.

लसीकरणातील आव्हाने

2 ते 18 वयोगटाचे लसीकरण हे प्रशासनासाठी एक मोठे ज्वलंत आव्हान ठरू शकते आणि सद्यस्थितील केंद्रीय आरोग्य खात्याची ढिलाई, अदूरदर्शीपणा आणि नियोजनशून्यता या 45 कोटी बालकांना आणि किशोरांना कोरोना संसर्गाच्या खाईत लोटू शकते. खालील महत्त्वाच्या गोष्टींचा केवळ विचारच नव्हे तर त्याबाबत नियमावली करून तिचे काटेकोरपणे पालन होणे ही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मुलांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने काळाची गरज आहे.

1. वयाप्रमाणे उपगट- वैद्यकीय शास्त्रात बालरोग शास्त्र शिकवताना एक महत्त्वाचे तत्त्व आचरण्यास सांगितले जाते. ‘लहान मुले म्हणजे मोठय़ा माणसांची छोटी आवृत्ती नसते.’ साहजिकच 2 ते 18 वयोगटातील मुलांच्या शरीराची आणि शरीरांतर्गत संस्थांची वाढ वेगवेगळ्या परिस्थितीत असते. त्यामुळे त्यांना औषधोपचार करताना या गोष्टी पाहाव्याच लागतात. लसीकरणाबाबत हे तत्त्व आचरावेच लागेल. त्यामुळे 2 ते 18 वयोगटातः-

– वय वर्षे 2 ते 5 (शिशूंचा गट),

– 5 पूर्ण ते 12 (पहिली ते सातवी हा शाळकरी मुलांचा गट)

– 13 ते 18 (आठवी ते बारावीपर्यंतच्या किशोरांचा गट) असे उपगट करावे लागतील.

या तीनही गटांसाठी एकच लस आणि तिचा एकाच डोस वापरला जाणे शक्य नाही. साहजिकच या प्रत्येक गटासाठी लसीचा किती डोस दिला जावा? हे शास्त्राीय तथ्य जाहीर होणे आवश्यक आहे. एवढेच नव्हे तर यातील प्रत्येक उपगटाला कदाचित वेगवेगळ्या लसींची आवश्यकताही भासू शकेल.

हिंदुस्थानातील नामवंत बालरोगतज्ञांच्या सल्ल्याने हे उपगट आणि त्यांचे डोसेस व लसींचे प्रकार ठरवले जाणे एव्हापर्यंत अपेक्षित होते. या तिन्ही उपगटांचे लसीकरण टप्प्याटप्प्याने आणि उलटय़ा क्रमाने सुरू करणे हे योग्य ठरेल. यामध्ये अक्षम्य दिरंगाई झालेली आहे.

2. पालकसभा- लहान मुलांचे लसीकरण विनाविलंब, सुरळीत आणि उत्साहाने होण्यासाठी पालकांचे मनोधैर्य उंचावण्याची गरज आहे. त्यामुळे प्रत्येक शाळेमध्ये पालकांच्या वर्गवार बैठका घेऊन त्यांचे सजगीकरण होणे आवश्यक आहे. त्यात लसीकरणाची प्रक्रिया, तिचे फायदे, उद्भवणारे दुष्परिणाम, त्यांची काळजी कशी घ्यायची याचे मार्गदर्शन तज्ञ डॉक्टरांमार्फत सविस्तरपणे केले जाणे आवश्यक ठरेल. शाळेत जाण्यापूर्वीच्या वयातील मुलांच्या पालकांचे प्रबोधन करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी स्थानिक प्रशासनाने, वैद्यकीय संस्थांनी, सामाजिक संस्थांनी बालरोगतज्ञांच्या उपस्थितीत नियमित बैठका घ्याव्या लागतील. याशिवाय समाज माध्यमे, वृत्तपत्रे आणि दूरदर्शनवरून सतत प्रबोधनपर जाहिराती आणि सूचना प्रदर्शित कराव्या लागतील.

3. संमतीपत्रक- 18 वर्षांखालील मुले सज्ञान नसतात. त्यांचे लसीकरण ही एक वैद्यकीय प्रक्रिया असल्याने लसीकरणासाठी ठरीव कायदेशीर पत्रकावर पालकांची लेखी संमती घ्यावी. यापूर्वीच्या लहान मुलांच्या लसीकरण मोहिमांचा अनुभव पाहता, पुढे काही कायदेशीर अडचणी निर्माण होऊ नयेत म्हणून ही संमती घेणे उपयुक्त ठरेल. अशी संमती घ्यायची किंवा नाही? घ्यायची असल्यास या संमतीपत्राचा कायदेशीर मसुदा काय असावा? याबाबतचा निर्णय केंद्र सरकारने लवकरात लवकर घेणे अपेक्षित होते.

4. तातडिक उपचार- लहान मुलांना लस देताना पालकांच्या मनावर निश्चितच ताण असणार. ’मुलाला इंजेक्शन दिल्यावर काही झाले तर?’ हा प्रश्न भेडसावत राहणार. त्यामुळे प्रत्येक लसीकरण केंद्रावर तातडिक उपचाराची व्यवस्था, तसेच अधिक काही गंभीर घडल्यास अॅम्ब्युलन्सची सोय आणि सुसज्ज हॉस्पिटल्समध्ये दाखल करण्याची चोख व्यवस्था ठेवावी लागेल. लसीकरण केंद्रावरून घरी गेल्यावर बाळांना काही त्रास झाल्यास, टेलिफोनिक सल्ला देणारी यंत्रणा आणि अशा बाळांच्या उपचारासाठी हॉस्पिटल्स चोवीस तास तयार ठेवावी लागतील.

5. रजिस्ट्रेशन- केंद्र सरकारच्या नियमांप्रमाणे 18 वर्षे वयावरील जनतेला कोविन किंवा आरोग्य सेतू अॅपवर आपले नाव नोंदवावे लागते. या नोंदणीसाठी मोबाईल नंबर आणि आधार कार्ड नोंदवावे लागते. या गटातील असंख्य लहान मुलांकडे आधार कार्ड आणि मोबाईल असणे शक्य नाही. परिणामतः लहान मुलांची नावनोंदणी करताना त्यामध्ये बदल करावे लागतील वा नवे अॅप विकसित करावे लागेल. अॅपवर नाव नोंदवण्याऐवजी, वॉक-इन पद्धत ठेवून लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्याची मुक्तता सर्वत्र खुलेपणाने ठेवावी.

– [email protected]

(लेखक इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष आहेत.)