Ashes 2021 मैदानात अश्लील टिप्पणी, खेळाडूचा उद्दामपणा स्टंपमधील माइकमध्ये कैद; Video

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये सध्या अॅशेस मालिका (Ashes 2021) सुरू आहे. या मालिकेच्या पहिल्या दोन लढतीत यजमान ऑस्ट्रेलियाने बाजी मारली असून तिसरी कसोटीही जिंकण्याकडे वाटचाल सुरू आहे. मेलबर्नमध्ये सुरू असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने आपली पकड मजबूत केली असून दुसऱ्या दिवशाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडचे दुसऱ्या डावात 4 गडी बाद केले आहे. इंग्लंडचा संघ अद्यापही 51 धावांनी पिछाडीवर असून कर्णधार जो रुटवर पाहुण्या संघाची मदार आहे.

तत्पूर्वी दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 267 धावांमध्ये संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर मार्कस हॅरीस (Marcus Harris) याने सर्वाधिक 76 धावा केल्या. हॅरीस खेळत असतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सशी बोलताना तो अभद्र भाषा वापरत असल्याचे यष्ट्यांमधील माइकमध्ये कैद झाले आहे.

तत्पूर्वी बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर मैदानावरील पंचांनी मार्कस हॅरीस याला पायचित दिले. मात्र हॅरीस याने डीआरएस घेतला आणि पॅडवर लागण्यापूर्वी चेंडू बॅटला लागल्याचे स्पष्ट झाल्याने तिसऱ्या पंचांनी मैदानावरील पंचांचा निर्णय बदलून त्याला नाबाद दिले. परंतु हॉटस्पॉटमध्ये चेंडू बॅटला लागला नसल्याचे दिसले. यानंतर हॅरीस नॉन स्टाईकला आला तेव्हा बेन स्टोक्सने त्याला खरच चेंडू बॅटला लागला होता का? असा सवाल केला. यावर हॅरीसने डीआरएस प्रणालीबाबत अल्शाघ्य भाषेत टिप्पणी केली.

दरम्यान, मार्कस हॅरीस हा पहिल्या दोन कसोटीमध्ये विशेष चमक दाखवू शकला नव्हता. तरीही तिसऱ्या कसोटीमध्ये त्याला संधी देण्यात आली. मिळालेल्या संधीचा फायदा उठवत हॅरीसने अर्धशतकीय खेळी केली. दुसऱ्या बाजूने एकामागोमाग एक विकेट पडत असताना हॅरीसने एक बाजू लावून धरली आणि संघाला आघाडी मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले.