दहा जम्बो कोविड सेंटर सज्ज ठेवा, खासगी रुग्णालयातील बेडचा आढावा घ्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना आणि ओमायक्रोन रुग्णांची वाढत्या रुग्णसंख्येमुळे दहा जम्बो कोविड सेंटर सज्ज करण्यासाठी कार्यवाही करा आणि खासगी रुग्णालयांतील बेड तैनात करण्यासाठी आढावा घ्या असे निर्देश आज पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले. पालिका मुख्यालयात पालिका आयुक्तांनी वरिष्ठ अधिकाऱयांशी बैठक घेऊन त्यात कोरोना प्रतिबंधात्मक उपायांची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.

पालिकेच्या रुग्णालयात आवश्यकतेनुसार प्राणवायू पुरवठा उपलब्ध होण्यावर भर दिला आहे. पालिकेची सर्व रुग्णालये सज्ज पालिकेची सर्व रुग्णालये, जम्बो करोना केंद्रे, सुसज्ज ठेवण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. त्यात खाटा, रुग्णवाहिका, औषधे, मनुष्यबळ, आदींचा आढावा घेऊन त्याप्रमाणे तयारी करण्यास सांगितले आहे. पालिकेच्या सर्व विभागातील विभागीय नियंत्रण कक्षाला कामकाजाचा नियमित आढावा घेण्याचे आदेशही दिले आहेत. पहिल्या आणि दुसऱया लाटेवेळी पालिकेने कोरोना उपचार केंद्रांसाठी घेतलेल्या जागा, रुग्णालयातील ताब्यात घेतलेल्या खाटा आदींची माहिती अद्ययावत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

या बैठकीला अतिरिक्त पालिका आयुक्त पी. वेलरासू, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, सह आयुक्त अजितकुमार कुंभार, सह आयुक्त चंद्रशेखर चोरे, उपायुक्त रमाकांत बिरादार, संजय कुऱहाडे, अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी आदी उपस्थित होते.

ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवा

पालिका रुग्णालय, जम्बो करोना केंद्रात सुरू असलेल्या प्राणवायू पुरवठयात कमतरता राहू नये, असे स्पष्ट केले आहे. त्या ठिकाणच्या क्षमतेची चाचणी घेतानाच रुग्णालयातील प्रत्येक खाटेपर्यंत प्राणवायू योग्यप्रमाणे आणि प्रमाणात पोहोचतो का याची खातरजमा करण्याच्या सूचना आयुक्तांकडून देण्यात आल्या आहेत.