
जगभरात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा प्रकोप होत आहे. हिंदुस्थानातही ओमाक्रॉनने हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. देशातील 21 राज्यांमध्ये ओमायक्रॉनचा फैलाव झाला असून ओमायक्राॉनचे 650 पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. ओमायक्रॉनचा झपाट्याने वाढता फैलाव लक्षात घेता विविध राज्यांनी निर्बंध लागू केले आहेत. या व्हेरिएंटला रोखण्यासाठी लोकांनी योग्य ती काळजी घेतली नाही तर हिंदुस्थानातही हा व्हेरिएंटचा उद्रेक होऊ शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
हैदराबादच्या कृष्णा इन्स्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे (KIMS) संचालक डॉक्टर संबित यांनी याबाबतचा इशारा दिला आहे. ओमायक्रॉनला रोखण्यासाठी योग्य ती काळजी घेतली गेली नाही तर जानेवारी 2022 च्या अखेरीपर्यंत देशात कोरोनाचा उद्रेक होईल, अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे. आपण जगापेक्षा वेगळे नाही. सध्या जगात ओमायक्रॉनचा कहर सुरू आहे. जग या व्हेरिएंटशी मुकाबला करत आहे. आपल्यालाही त्याचा मुकाबला करण्यासाठी सज्ज राहायला हवे, असे त्यांनी सांगितले.
ओमायक्रॉन आल्यानंतर देशातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली नाही. मात्र, आता रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या ओमायक्रॉनमुळे किंवा डेल्टामुळे वाढत आहे, हे निश्चित करता येत नाही. त्यासाठी जेनेटिक तपासणीची गरज आहे. आतापर्यंत आढळलेल्या रुग्णांमध्ये कोरोनाची तीव्र लक्षणे आढळलेली नाही. तसेच श्वासोश्वासात त्रास होत असल्याचे कोणत्याही रुग्णात आढळलेले नाही. त्यामुळे अजूनही योग्य ती काळजी घेत आपण ओमायक्रॉनचा उद्रेक टाळू शकतो, असे डॉक्टर संबित यांनी सांगितले.
ओमायक्रॉन झपाट्याने वाढल्यास देशाला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागणार आहे. सध्या जग या व्हेरिएंटशी मुकाबला करत आहे. आपल्यालाही त्यासाठी सज्ज राहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. कोरोना महामारीचा अभ्यास करणारे तज्ज्ञ गिरीधर आर. बाबू यांनीही धोक्याचा इशारा दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने याला ‘वैरिएंट ऑफ कंसर्न’ घोषित केले आहे. फक्त सणांच्या काळात कोरोना वाढत असला तरी हा झपाट्याने फैलावणारा व्हेरिएंट असल्याने प्रत्येकाने योग्य ती काळजी घेण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
सध्याची आकडेवारी आणि ओमायक्रॉनच्या वाढीचा वेग लक्षात घेता 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या काळात देशात सर्वाधिक रुग्णसंख्या असण्याची शक्यता आहे. ज्यांचे लसीकरण झालेले नाही किंवा आतापर्यंत कोरोनाची लागण झालेली नाही, अशा व्यक्तींना ओमायक्रॉनचा जास्त धोका असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. त्यामुळे आगामी महिना आपल्यासाठी महत्त्वाचा असून प्रत्येकाने योग्य ती काळजी घ्यावी. तसेच कोणतीही लक्षणे किंवा आजारपण जाणवल्यास कोरोना तपासणी करावी, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.



























































