
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत दहा दिवसांपूर्वी रक्तरंजित वळण लागले आणि महाविकास आघाडीचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर खुनी हल्ला झाला. या प्रकरणात अटक होईल या भीतीने भाजपचे आमदार नीतेश राणे गायब झाले असून अटकपूर्व जामिनासाठी त्यांची धडपड सुरू झाली आहे. आज जिल्हा व सत्र न्यायालयात या अर्जावर सुनावणी झाली, मात्र ती पूर्ण होऊ न शकल्याने यावर आज निर्णय होणार आहे. त्यामुळे नीतेश राणे यांच्या डोक्यावर अटकेची तलवार आज दुपारपर्यंत तरी लटकलेलीच राहणार आहे.
अंतरिम जामीन का मागितला?
जिल्हा बँक निवडणुकीचे मतदान दोन-तीन दिवसांवर आल्याने नीतेश राणे यांना अंतरिम जामीन द्यावा अशी विनंती त्यांचे वकील ऍड. संग्राम देसाई यांनी कोर्टाला केली, पण न्यायमूर्तींनी ती फेटाळली.
संतोष परब यांच्यावरील हल्ल्यानंतर पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून त्यातील एक जण नीतेश राणे यांच्या स्वाभिमान संघटनेचा पुण्यातील कार्यकर्ता आहे. नीतेश राणे आणि गोटय़ा सावंत या दोघांच्या सांगण्यावरूनच आपणावर हल्ला झाल्याचा जबाब परब यांनी पोलिसांना दिला असून शिवसेनेनेही राणे-सावंत या जोडगोळीला अटक करा अशी जोरदार मागणी केली आहे. यानंतर अटक टाळण्यासाठी नीतेश राणे नॉट रिचेबल झाले आहेत आणि अटकपूर्व जामिनासाठी त्यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली.
दिलासा नाहीच
आज दुपारी चार वाजता सुनावणीला सुरुवात झाली ती तब्बल तीन तास चालली. राणे यांचे वकील संग्राम देसाई, राजेंद्र रावराणे, सरकारी वकील प्रदीप घरत आणि फिर्यादी परब यांचे वकील विकास पाटील शिरगावकर यांनी जोरदार युक्तिवाद केला. साडेसहा वाजता कोर्टाची वेळ संपली. तेव्हा संग्राम देसाई यांनी पुन्हा 10 मिनिटांची वेळ वाढवून मागितली. देसाई यांनी कोर्टाकडे अंतरिम जामिनाची मागणी केली होती, मात्र ही मागणी न्यायालयाने फेटाळली आणि नीतेश राणे यांना दिलासा देण्यास नकार दिला. आज सुनावणी अपूर्ण राहिल्याने उद्या बुधवारी दुपारी 3 वाजता पुन्हा सुनावणीला सुरुवात होईल आणि त्यानंतरच नीतेश राणे यांना जेल की बेल याचा फैसला होईल.
कोर्टात काय घडले?
फिर्यादीचे वकील ऍड. विकास पाटील शिरगावकर यांनी युक्तिवादाला सुरुवात केली. फिर्यादी परब यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. हा प्रकार अपघाताचा नव्हे, तर विचारपूर्वक हत्याराने वार केल्याचा आहे. यामध्ये मुख्य सूत्रधार हे नीतेश राणे आहेत. भविष्यात संतोष परब यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे परब कुटुंब भीतीच्या छायेखाली आहे. केंद्रीय मंत्री जर केंद्रात आमचे सरकार आहे अशी भाषा वापरत असेल तर ही आम्हाला दिलेली धमकीच आहे असे का समजू नये, असे कोर्टात विचारल्याचे शिरगावकर यांनी सुनावणीनंतर पत्रकारांना सांगितले.
देसाई यांचा युक्तिवाद
नीतेश राणे यांची बाजू मांडताना ऍड. संग्राम देसाई यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. कुठलेही सर्च वॉरंट नसताना पोलिसांनी नीतेश राणे यांना शोधण्यासाठी त्यांच्या रुग्णालयात जाऊन झडती का घेतली? फिर्यादी परब यांचा सत्कार अजित पवार यांनी कसा केला? संशयितांची नावे गुप्त का ठेवली जात आहेत? नीतेश राणे, गोटय़ा सावंत यांना नोटीस पाठवल्याचे मीडियाला का सांगितले? हल्ल्यानंतर आरोपीने फोनवरून संपर्क साधल्याचे फिर्यादीचे म्हणणे आहे. मात्र कोणता आरोपी भरररस्त्यात फोन करेल? असे प्रश्न उपस्थित करतानाच ऍड. देसाई यांनी विधान भवनाच्या पायऱयांवर जे झाले त्याचा राग काढला जात असल्याचे कोर्टात सांगितले. हाच राग मनात ठेवूनच नीतेश राणे यांना या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचेही ते म्हणाले. नीतेश राणे आणि आरोपी सचिन सातपुते यांचा सीडीआर पोलिसांना मिळाला असेल तर दोघांची समोरासमोर चौकशी कशाला, असेही ऍड. देसाई यांनी विचारले.
विधान भवनातील पायऱयांचा कोर्टात काय संबंध?
विधान भवनाच्या पायऱयांवरील राग येथे काढला आहे, या ऍड. देसाई यांच्या मुद्याला सरकारी वकील ऍड. प्रदीप यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, विधान भवनातील पायऱयांवर काय घडले त्याचा कोर्टात काय संबंध? आरोपी सर्व लोकांसमोर भरदुपारी चाकूहल्ला करतात. मग नीतेश राणे, गोटय़ा सावंत यांना फोनवरून हल्ला केल्याचे का सांगू शकत नाही असा सवाल करतानाच आमच्या मागे मोठे हात आहेत असे आरोपींना सुचवायचे असेल, असे ऍड. घरत म्हणाले. पोलिसांविरोधात तक्रार नसल्याचे सांगता, मग पोलिसांवर दबाव आहे असे का म्हणता? पोलिसांवरून तुमच्या दोन वेगवेगळय़ा भूमिका का, असा सवालही त्यांनी केला. सातपुते हा स्वाभिमानचा कार्यकर्ता होता. नंतर त्याने भाजपात प्रवेश केला, याकडेही ऍड. घरत यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. संतोष परब यांना हल्लेखोर ओळखत नव्हते तर त्यांनी परब यांच्या गाडीला का धडक दिली? ते धडक देऊन थांबले नाहीत, तर त्यांनी येऊन त्यांच्या छातीवर चाकूने वार केले हे मेडिकल रिपोर्टमध्ये स्पष्ट नमूद आहे. परब यांना ज्या इनोव्हा कारने धडक दिली त्यातील दोघांनी माझ्यासमोर नीतेश राणे आणि गोटय़ा सावंत यांना कळवायला पाहिजे असे बोलल्याचे परब यांनी फिर्यादीत म्हटल्याचेही ऍड. घरत यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले.
याचिकाकर्ते
n हल्ल्यानंतर आरोपीने फोनवरून संपर्क साधल्याचे फिर्यादीचे म्हणणे आहे. मात्र कोणता आरोपी भररस्त्यात फोन करेल?
n विधान भवनाच्या पायऱयांवर जे झाले त्याचा राग काढला जात आहे. हाच राग मनात ठेवूनच नीतेश राणे यांना या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न होत आहे.
n नीतेश राणे आणि आरोपी सचिन सातपुते यांचा सीडीआर पोलिसांना मिळाला असेल तर दोघांची समोरासमोर चौकशी कशाला?
सरकारी वकील
n विधान भवनातील पायऱयांवर काय घडले त्याचा कोर्टात काय संबंध? आरोपी सर्व लोकांसमोर भरदुपारी चाकूहल्ला करतात. मग नीतेश राणे, गोटय़ा सावंत यांना फोनवरून हल्ला केल्याचे का सांगू शकत नाही.
n पोलिसांविरोधात तक्रार नसल्याचे सांगता, मग पोलिसांवर दबाव आहे असे का म्हणता? पोलिसांवरून तुमच्या दोन भूमिका का?
n सातपुते हा स्वाभिमानचा कार्यकर्ता होता. नंतर त्याने भाजपात प्रवेश केला.
फिर्यादीचे वकील
n हा प्रकार अपघाताचा नव्हे, तर विचारपूर्वक हत्याराने वार केल्याचा आहे. यामध्ये मुख्य सूत्रधार हे नीतेश राणे आहेत.
n केंद्रीय मंत्री जर केंद्रात आमचे सरकार आहे अशी भाषा वापरत असेल तर ही आम्हाला दिलेली धमकीच आहे असे का समजू नये?






























































