
यंदाच्या ख्रिसमस आणि नववर्षाच्या सेलिब्रेशनवर ओमायक्रोनचे सावट आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. देशातील ओमायक्रोनबाधितांची आकडा मंगळवारी 653 वर पोहोचला आहे. सर्वाधिक म्हणजे 167 रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्याखालोखाल दिल्लीत 165 आणि केरळमध्ये 57 रुग्ण आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आजवर 186 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
देशातील अन्य राज्यांमध्येदेखील ओमायक्रोमचे रुग्ण आढळले आहेत. तेलंगणामध्ये 55, गुजरातमध्ये 49, राजस्थानमध्ये 46, तामीळनाडूमध्ये 34 आणि कर्नाटकमध्ये 31, मध्य प्रदेशात 9, ओडिशामध्ये 8 रुग्ण आढळले आहेत. याशिवाय आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी 6, हरयाणा आणि उत्तराखंडमध्ये प्रत्येकी 4, चंदिगड आणि जम्मू- कश्मीरमध्ये प्रत्येकी 3 आणि उत्तर प्रदेशात ओमायक्रोनचे दोन रुग्ण आढळले आहेत. गोवा, हिमाचल प्रदेश, लडाख आणि मणिपूरमध्ये ओमायक्रोनचा प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे.
दरम्यान, गेल्या 24 तासांमध्ये हिंदुस्थानात 6,358 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले असून 6,450 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 75,456 एवढी असून रिकव्हरी रेट 98.40 टक्क्यांवर आहे.




























































