अनिल देशमुख यांच्यासह मुलांविरोधात ईडीचे आरोपपत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात कथित मनी लॉण्डरिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने सात हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. अनिल देशमुख यांच्यासह त्यांची दोन मुले ऋषिकेश आणि सलील देशमुख यांचीही आरोपपत्रात नावे आहेत.

अनिल देशमुख यांच्याविरोधात 100 कोटींच्या कथित वसुली प्रकरणात माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी आरोप केले होते. याप्रकरणी ईडीकडून झालेल्या चौकशीनंतर 2 नोव्हेंबरला त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर कथित मनी लॉण्डरिंग प्रकरणात ईडीचे हे दुसरे आरोपपत्र आहे.

ईडीच्या म्हणण्यानुसार देशमुख यांनी बार आणि रेस्टॉरंटच्या मालकांकडून 4 कोटी 70 लाख रुपये वसूल केले होते. ही रक्कम मुंबई पोलिसांचे सहाय्यक निरीक्षक सचिन वाझेमार्फत वसूल केली. या रकमेपैकी 4 कोटी 18 लाख रुपये दिल्लीतील चार वेगवेगळ्या शेल कंपन्यांमध्ये जमा करण्यात आले होते. या पंपन्यांनी ही रक्कम श्री साई शिक्षण संस्थान ट्रस्टला दिली. ही ट्रस्ट अनिल देशमुख आणि त्यांचे कुटुंब चालवतात. म्हणजेच वसुलीचा पैसा शेल कंपन्यांच्या माध्यमातून देशमुख यांच्या ट्रस्टवरच वापरला गेला, असा ईडीचा आरोप आहे.