
नगर जिल्ह्यात विविध प्रकारचे संघटित गुन्हे करणाऱ्या तब्बल 401 टोळ्या आहेत. त्यापैकी 16 टोळ्यावर मोक्का कायद्यातंर्गत कारवाई केली असून अन्य टोळ्यांचे माहिती संकलन सुरू आहे व त्यांच्यावर पोलिसांची नजर आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी गुरुवारी दिली. नगर जिल्ह्यामध्ये या वर्षी बारा हजार 252 गुन्हे दाखल झाले असल्याची माहिती देताना उशिरा गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण घटल्याचा दावा त्यांनी केला.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधताना 2021 या वर्षभरात पोलिसांनी केलेल्या कामगिरीची माहिती दिली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अनील कटके, शहर विभागातील पोलीस उपअधीक्षक कातकडे आदी यावेळी उपस्थित होते. येत्या नव्या वर्षात दाखल प्रत्येक गुन्ह्याचा जलद तपास करणे तसेच वाहन चोरीला आळा घालण्याचे उद्दिष्ट असल्याचे पाटील यांनी सांगितले.
पोलीस अधीक्षक मनोज पाटील म्हणाले, नगर जिल्ह्यामध्ये पोलीस ठाण्याच्या अंतर्गत 12252 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याशिवाय अदखलपात्र गुन्हे, चौकशी अर्ज व अन्य मिळून 40 हजारावर आणखी गुन्हे आहेत. त्याचा निपटारा करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केला असून 1 जानेवारी ते आतापर्यंत जिल्ह्यांमध्ये 51 हजार 721 गुन्ह्यांचा निपटारा करण्यात आलेला आहे. पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, पोलीस नाईक व अन्य आणि फक्त गुन्हे तपास करणाऱ्या 1 हजार पोलिसानी प्रत्येकी साधारणता 51 गुन्हे तपासासाठी होते असे ते म्हणाले. नगर जिल्ह्यामध्ये मागील वर्षी दरोड्याचे 55 गुन्हे दाखल होते त्यातील 51 उघड झाले. मात्र, यावर्षी 56 गुन्हे दाखल होऊन सर्वच सर्व गुन्हे उघड झाले आहे आणि त्याची टक्केवारी शंभर टक्के आहे.
घरफोडीचे मागील वर्षी 569 गुन्हे होते व त्यापैकी 120 उघड झाले. यावर्षी घरफोडीचे 796 गुन्हे दाखल झाले. त्यापैकी 121 गुन्हे उघड झाले, तर चोरी प्रकरणांमध्ये मागील वर्षी 2128 गुन्ह्यांपैकी 727 गुन्हे उघड झाले व यावर्षी तीन हजार 92 गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी सातशे दोन गुन्हे उघड झाले आहे, असे त्यांनी सांगितले
जिल्हामध्ये दारूबंदीचे तीन हजार चार गुन्हे दाखल झाले असून 3459 आरोपीं यामध्ये समावेश आहे. तर जुगारमध्ये एक हजार एकशे आठ गुन्हे दाखल झाले असून यामध्ये 2216 आरोपी वर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. गावठी कट्टे यावर्षी 43 सापडले असून 67 जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहे. तर 42 तलवारी, चार कोयते, अकरा सुरे जप्त करून एकूण 55 आरोपींविरुद्ध आम्ही गुन्हे दाखल केले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
या वर्षभरामध्ये अमली पदार्थांच्या संदर्भामध्ये पंधरा हजार 299 किलो मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून 35 आरोपींचा यामध्ये समावेश आहे. या प्रकरणासंदर्भात 15 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत तर अफू प्रकरणाचा एक गुन्हा दाखल करण्यात आला असून 50 किलो मुद्देमाल यामध्ये जप्त करण्यात आला आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. या दोन्हीची रक्कम सुमारे दोन कोटी 93 लाख रुपये एवढी आहे.
जिल्ह्यामध्ये यावर्षी अवैध वाळू संदर्भामध्ये 169 गुन्हे दाखल करण्यात आले असून वाहने व वाळू असा एकूण 20 कोटी 85 लाख 35000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून 285 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.सुगंधित तंबाखूच्या विरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करून 103 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईमध्ये पोलिसांनी 169 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केले आहेत. त्या जिल्हामध्ये बायोडिझेलच्या संदर्भामध्ये आणि कारवाई करण्यात आली असून सात गुन्हे दाखल आहे. यामध्ये तीन कोटी 22 लाख 96 हजार 140 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून 30 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचेही अधीक्षक पाटील यांनी यावेळी सांगितले.अवैध सावकारीच्या संदर्भात 21 गुन्हे दाखल करण्यात आले असून पंधरा लाख 41 हजार 990 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. जिल्हाभरामध्ये प्रतिबंधात्मक कारवाई सुद्धा करण्यात आल्या आहेत त्यांची एकंदरीत संख्या 12208 एवढी आहे.
मोक्का अंतर्गत नगर जिल्ह्यामध्ये 16 प्रस्ताव तयार करण्यात आले असून 14 प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे, यामध्ये आरोपींची संख्या ही 83 आहे अजूनही दोन प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत असून त्यात 15 आरोपी असल्याचे अधीक्षक पाटील यांनी यावेळी सांगितले. तर एमपीडीए अंतर्गत आठ प्रस्ताव तयार करण्यात आले असून ते प्रलंबित आहेत. हद्दपारीच्या कारवाया पोलिसांनी यावर्षी केल्या असून त्यांत 164 एवढी आरोपींची संख्या आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
राज्यात प्रथम क्रमांक
नगर जिल्हा गुन्हे दाखल करण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांकाचा जिल्हा आहे. आम्ही या वेळेला कोणत्याही पोलीस ठाण्यांमध्ये अर्ज स्वीकारणार नाही व थेट गुन्हे दाखल करणार अशा प्रकारचे निर्देश दिलेले होते. त्यामुळे गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण जिल्ह्यामध्ये वाढले आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. या अगोदर नगर जिल्ह्यामध्ये स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये मागील वर्षी पाच हजार 206 अर्ज दाखल करण्यात आले होते, या वर्षी फक्त 706 अर्ज दाखल झाले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आगामी काळामध्ये अर्ज दाखल होण्याचे प्रमाण सुद्धा कमी होईल असे ते म्हणाले.
तपासाचा दर्जा उंचवण्याचे लक्ष्य
नगर जिल्ह्यामध्ये आम्ही आगामी काळामध्ये चांगल्या प्रकारचे तपास व अधिक गतीने कशा पद्धतीने व दर्जेदार होईल, याची सुद्धा निश्चित खबरदारी घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात शिक्षेचे प्रमाण सुमारे 50 टक्के आहे. त्यामुळे जे आरोपी पकडले आहे, त्यांच्या संदर्भामध्ये न्यायालयामध्ये दोषारोपपत्र तात्काळ कशा पद्धतीने दाखल केले जातील, तपास दर्जेदार करून व कायद्यानुसार आवश्यक साक्षीपुरावे गोळा करण्याकडे अधिक लक्ष देणार असल्याने भविष्यात शिक्षा प्रमाण वाढेल, असा विश्वास या अधीक्षक पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. चोऱ्या व घरफोडी प्रकरणांचा तपासात अपेक्षित यश मिळाले नसल्याची कबुली पाटील यांनी दिली. यापुढे यावर आळा घालण्यास प्राधान्य असणार आहे, तसेच नगर जिल्ह्यामध्ये दुचाकी चोरीचे प्रमाण सर्वाधिक आता वाढलेले आहे, हीसुद्धा चिंतेची बाब आहे. हे प्रकार कशामुळे वाढले आहेत याचा सुद्धा निश्चितपणे आढावा घेतला जाईल व आवश्यक उपाययोजना केल्या जातील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
साडेचार हजारावर गुन्हेगार रेकॉर्ड तयार
नगर जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी टू प्लस योजना प्रभावीपणे सुरू करण्यात आलेली आहे. आत्तापर्यंत नगर जिल्ह्यामध्ये चार हजार 843 आरोपी यामध्ये निष्पन्न झाले आहेत. यांची माहिती वेबसाईटच्या माध्यमातून एकत्रितपणे करण्यात आलेली आहे. या आरोपींमध्ये माला विरुद्ध 2406 गुन्हेगार तर शरीरा विरुद्ध गुन्हे करणारे 2436 गुन्हेगार आहेत. नगर जिल्ह्यामध्ये एकूण 401 टोळ्या निष्पन्न झाले असून त्यांच्यावर आमची आता नजर राहणार असल्याचे अधीक्षक पाटील यांनी यावेळी सांगितले.






















































