
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील आणि मुंबईला वेगवान-सुरक्षित, प्रदूषणमुक्त प्रवास देणारा पालिकेचा महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्प डिसेंबर 2023 पर्यंत मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. सद्यस्थितीत एकूण प्रकल्पाचे 50 टक्के काम पूर्ण झाले असून पहिल्या बोगद्याचा 2 किमीचा महत्त्वपूर्ण टप्पाही पूर्ण झाला आहे.
प्रिसेन्स स्ट्रीट फ्लाय ओव्हर ते वरळी सी-लिंकपर्यंत 10.58 किमीच्या कोस्टल रोडचे काम सध्या वेगाने सुरू आहे. या बांधकामात पॅकेज प्रियदर्शिनी पार्क ते छोटा चौपाटीदरम्यान 2.070 किलोमीटरचा तीन लेनचा बोगदा दोन्ही बाजूंनी बांधण्यात येत आहे. यातील पहिल्या बोगद्याचा 2 किमीचा टप्पा पूर्ण झाला आहे. तर उर्वरित 70 मीटर लांबीच्या बोगद्याचे काम येत्या 8 ते 10 दिवसांत पूर्ण होणार आहे. पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू आहे. हे काम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असल्याचे प्रकल्पाचे प्रमुख अभियंता विजय निघोट यांनी सांगितले. या प्रकल्पामुळे वाहतूककोंडीचा प्रश्न मोठय़ा प्रमाणात सुटणार असून 34 टक्के इंधनाची बचत होणार आहे आणि 70 टक्के वेळही वाचणार आहे.
असे होतेय आव्हानात्मक बोगद्यांचे काम
n दोन्ही बाजूच्या वाहतुकीसाठी प्रत्येकी 1 अशा दोन बोगद्यांचे काम सुरू आहे. हे बोगदे प्रियदर्शिनी पार्क ते नेताजी सुभाष मार्गालगत (मरीन ड्राइव्ह) येथे छोटय़ा चौपाटीपर्यंत बांधले जात आहेत.
n हे बोगदे मलबार हिलखालून जाणार आहेत. या दोन्ही बोगद्याचे काम जमिनीखाली 10 ते 70 मीटरपर्यंत केले जात आहे. बोगद्यांसाठी ‘मावळा’ टनेल बोअरिंग मशीन वापरले जात आहे.
n दोन्ही बोगद्यांची लांबी प्रत्येकी 2.070 किमी आहे. दोन्ही बोगद्यांचा व्यास 12.19 मीटर आहे. दोन्ही बोगद्यांना अंतर्गत काँक्रीट लायनिंग करण्यात येत आहे.
n बोगद्यांमध्ये हवा खेळती राहण्यासाठी सकार्डो तंत्रज्ञान वापरले जात आहे. देशातील हा पहिलाच प्रयोग आहे.





























































