
>> शिरीष कणेकर
माणूस एकटाच जगात येतो व एकटाच जातो, हे मी ऐकून आहे, पण आल्यापासून जाईपर्यंत तो जगात एकटाच असतो हे निघायची वेळ जवळ येत चालली तसं अनुभवानं मला सांगितलंय, शिकवलंय.
माझ्या पंचाहत्तरीच्या कार्यक्रमात नाना पाटेकर बोलून गेला, ‘शिरीष एकटा आहे. भारी एकटा आहे. त्याला खरबडून पाहिलात तर आत एकाकी, हळवा माणूस आढळेल. आपलं हे रडवेलं व्यक्तिमत्त्व आजवर त्यानं सफाईनं दडविलंय…’
मी चमकलो. खुर्चीतल्या खुर्चीत आक्रसलो. मान्यवरांच्या उपस्थितीत, एवढय़ा लोकांच्या गर्दीत, खचाखच भरलेल्या थिएटरात अनपेक्षितपणे नानानं मला विवस्त्र केलं होतं. त्याचा हेतू अर्थातच चांगला होता. तो माणूस म्हणून मला उघडून लोकांपुढे मांडत होता. लोक स्तंभित झाले. फटकळ नानाचा हळुवारपणा पाहून व माझ्या अंतरंगाचा हा आजवर न दिसलेला व लेखनातून न कळलेला भाग जाणून श्रोतृवर्गाला काहीतरी वाटत होतं, हे लांबून स्टेजवरून मला कळत होतं.
नियती काय चीज असते नाही? माझा बुरखा फाडायला आणि एकटेपणाचं प्रदर्शन मांडायला तिला माझाच जाहीर सत्कार मिळाला होता. माझ्यासारख्या फिल्मी माणसाला ही सिच्युएशनही फिल्मीच वाटली. बोलणारा नाना तर फिल्मवालाच होता. आत येताना मी मी होतो. आता बाहेर जाईन तो वेगळाच माणूस असेन. एकटा!
मला एकटा म्हणवून घेण्याची हौस नाही की त्यात काही मोठेपणा वाटत नाही. एकटा म्हणजे ‘स्पेशल’ नाही. एकटा म्हणजे एकाकी, ‘मुझे मेरे हाल पे छोड दो’ म्हणणारा. कळप करून राहतो तो माणूस अशी जर माणसाची व्याख्या केली जाते तर मग मी असा कसा? दिवे घालवून अंधार करून एकटा बसण्यात मला समाधीस्थ झाल्याचे सुख व शांती लाभते.
माझ्या मुलीपेक्षाही वयानं लहान असलेली माझी एक वाचिका मला फुलपाखरू म्हणते. म्हणजे आनंदी, स्वच्छंदी व डोळय़ांना सुखकारक. मी फुलपाखरू? मी कधी मध गोळा करीत या फुलावरून त्या फुलावर झेपावलोय? पोरंटोरं माझ्या मागे कधी धावलीत? ‘छान किती दिसते फुलपाखरू’ अशी छान छान गाणी कोणी माझ्यावर रचलीत? माझा एक मित्र मला हातोडा म्हणतो. ‘का रे बाबा, हातोडा का?’ मी थकून विचारले, ‘अरे, हातोडा म्हणजे दिसेल त्या गोष्टीला, त्या वस्तूला, त्या माणसाला ठोकणार.’ फुलपाखरू ते हातोडा ही माझी रेंज आहे तर!
माझे वडील मुंबईच ‘पोलीस सर्जन’ होते. भायखळा पोलीस स्टेशनच्या बाजूला आमचा बंगला होता. अण्णा खाली असायचे; मी वर असायचो. जेवायला किंवा चहाला मला बोलवायचं असलं की खास माझ्यासाठी बसवून घेतलेली बेल अण्णा वाजवत. कधी कधी तर मी समोर येऊन उभा राहीपर्यंत ते बेलच्या बटणावरचा हात काढत नसत. माझी लक्षणंच तशी होती.
एकदा घरात कुणी नव्हतं. ते खाली आणि मी वर. त्यांनी बेल वाजवून मला खाली बोलावलं.
‘तुझा प्रॉब्लेम तरी काय आहे? तुला घरात राहायचं नाही का?’ त्यांच्या आवाजाला वेगळीच धार होती.
त्यांना मी यापूर्वी इतके प्रक्षुब्ध कधीही पाहिले नव्हते. माझ्या घशाला कोरड पडली. माझ्या तोंडून शब्द निघेना. डोळे ओले झाले. माझ्या अगतिकेतेची मलाच चीड येत होती. माझी पिढी अशीच खाली मान घालून जगली व एक दिवशी मरून गेली. तोंड उचकटून बोलणं आम्हाला जमलंच नाही.
‘मी कोणाच्या अध्यात नसतो की मध्यात नसतो.’ मी कसंबसं म्हणालो.
‘का?’ अण्णा ओरडले, ‘का कोणाच्या अध्यातमध्यात नसतोस?’
मला बारा गाडे बोलायचं होतं, पण मी एकही शब्द बोलू शकलो नाही. मी धाड धाड जिना चढून वर गेलो आणि वर एकटाच ओक्साबोक्शी रडलो. आजही मी कोणाच्या अध्यातमध्यात नसतो. कधीतरी रात्रीबेरात्री खोलीत एकटाच झोपलेला असताना अण्णांचे शब्द दाभणांसारखे माझ्या कानात घुसतात – ‘का कोणाच्या अध्यातमध्यात नसतोस?’ काय बोलू आता? अण्णा गेले तेव्हा एकावन्न होते. मी आज अठ्ठय़ाहत्तर आहे. त्यांचं बोलणं आठवून मी मुळूमुळू रडणं शोभतं का? माझं मन मला सांगतं, ‘बी स्ट्राँग.’ तेच मन मग विचारतं, – कशासाठी स्ट्राँग? कुणासाठी स्ट्राँग? कशात स्ट्राँग, कसं स्ट्राँग?…’
अण्णासारखं अधिकारानं व आत्मीयतेनं विचारणारं तरी आता कोण आहे? अन् मी एकटा आहे. अगदी एकटा. मी चालतो तेव्हा मागून लोकांच्या झुंडी येत नाहीत, ते खांद्यावरून मागे न बघताही मला कळतं. मी जाईन तेव्हा कोणी काही बोललंच तर बोलेल, – ‘त्यांच्या मागे तेच होते एकटे.’
माझ्या पंचाहत्तरीच्या समारंभात माझ्या एकटेपणावर अचूक बोट ठेवणारा नाना पाटेकरही गेल्या तीन वर्षांत मला भेटलेला नाही. मी एकटाच बरा असं त्यालाही वाटलं असेल.
अब इंतजार है मुझे जिंदगी के आखरी पन्नेका
सुना है अंत मे सब ठीक हो जाता है
– [email protected]



























































