साधू बनायचं होतं, झालो अभिनेता; बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्याचा खुलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवाजुद्दीन सिद्दीकी याचे नाव आज बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये घेतले जाते. चित्रपट, वेब सीरिजच्या माध्यमातून आपला ठसा उमटवलेला नवाजुद्दीन याचे आगामी काळाच पाच मोठे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. मात्र एक काळ असा होता की त्याला चित्रपटांमध्ये भूमिका मिळवण्यासाठी खूप झगडावे लागत होते.

बॉलिवूडमधील नवाजुद्दीनचा प्रवास अनेक लहान-मोठ्या अडथळ्यांनी भरलेला आहे. दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (एनएसडी) मधून बाहेर पडल्यानंतर यशाची चव चाखण्यासाठी नवाजुद्दीला तब्बल 15 वर्ष वाट पहावी लागली. तोपर्यंत त्याने चित्रपटांमध्ये लहान भूमिकाही केल्या. मात्र लीड रोल मिळवण्यासाठी त्याला बरेच परिश्रम करावे लागले.

आज नवाजुद्दीने यशस्वी अभिनेता असला तरी स्ट्रगलच्या काळामध्ये त्यानेही हार मानली असती तर तो आज काय बनला असता? असा सवाल ‘आज तक’च्या एका कार्यक्रमात त्याला विचारण्यात आला. यावेळी त्याने दिलेले उत्तर सर्वांनाच अचंबित करणारे होते. अभिनेता बनलो नसतो तर मी साधूबाबा झालो असतो, असे नवाजुद्दीन म्हणाला.

मी अभिनेता झालो नसतो तर मॉन्क (साधू-संत) झालो असतो. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण मी तसा प्रयत्नही केला होता. मी धर्मशाळेत गेलो आणि तेथे 15 दिवस राहिलो. ग्रॅज्यूएशननंतर मला साधू-संत बनण्याची इच्छा होती. परंतु तसे काही झाले नाही आणि मी अभिनेता बनलो. दहावीत असल्यापासून डोंगरांवर जाऊन साधू-संत बनावे असा विचार माझ्या मनात घोळत होता, असेही नवाजुद्दीन याने सांगितले.

मी जोपर्यंत वेगवेगळ्या भूमिका करतोय आणि लोकांचे मनोरंजन करतोय तोपर्यंत मला अभिनयामध्ये रस राहील. जर मी एकसारख्या भूमिका करू लागलो तर मी देखील बोर होईल आणि तेव्हा नक्की साधू बनेल. माझा काही भरोसा नाही, खरेच मी बनूही शकतो, असे नवाजुद्दीन म्हणाला.