आकाशातून पडला माशांचा पाऊस.. वाचा काय आहे शास्त्रीय कारण?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अचानक आलेल्या वादळाने पाऊस किंवा गारा पडणं ही तशी सामान्य बाब आहे. पण, पावसातून पाणी किंवा गारांऐवजी मासे पडले तर? अशीच एक घटना अमेरिकेतील टेक्सास भागात घडली आहे.

टेक्सासमधील अरकन्सास भागाच्या सीमेवर हा पाऊस पडला. आधी जेव्हा हा पाऊस सुरू झाला, तेव्हा स्थानिकांना हा पाऊस म्हणजे गारांचा असावा, असं वाटलं. त्यामुळे कुणीही घराबाहेर पडलं नाही. पण, जेव्हा हा पाऊस थांबला तेव्हा त्यांनी पाहिलं की आकाशातून गारा नव्हेत तर चक्क मासे पडले होते.

हे मासे 6 ते 7 इंचाचे होते. संपूर्ण शहरात माशांचा दुर्गंध पसरला होता. वाऱ्यासोबत तो गंध वेगाने शहरभर पसरला होता. या माशांची डोकी फुटली होती. कुणीतरी खूप उंचावरून फेकल्यासारखे ते दिसत होते. जेव्हा ते पडले, तेव्हा ते जिवंत असावेत. कारण क्राँक्रिटच्या पृष्ठभागावर ते काही सेकंद तडफडले आणि मृत पावले, असं ही घटना पाहणाऱ्या एका नागरिकाचं म्हणणं आहे.

स्थानिकांनी या माश्यांची विल्हेवाट लावण्याची एक नामी शक्कल शोधली. त्यांनी ते मासे जमा करून घेतले. या माशांच्या मासांचा गळ म्हणून वापर करून मोठा मासे पकडण्यासाठी त्याचा वापर करण्यात येणार आहे.

कसा पडतो माश्यांचा पाऊस?

वास्तविक हा असा पाऊस पडण्यामागे एक भौगोलिक कारण आहे. अमेरिकेसारख्या देशांमध्ये चक्रीवादळं यायचं प्रमाण अधिक आहे. ही चक्रीवादळं समुद्रातून जमिनीच्या दिशेने येतात. त्यामुळे समुद्राच्या वरच्या भागात पोहोणारे मासे, खेकडे, बेडूक आणि तत्सम अन्य प्राणी या चक्रीवादळात सापडतात. जेव्हा हे चक्रीवादळ जमिनीच्या दिशेने येतं, तेव्हा त्याची क्षमता कमी होते आणि पावसाच्या रुपाने चक्रीवादळात सापडलेले जीव जमिनीवर पडतात.