
राज्यात कोरोनाच्या साथीची तिसऱ्या लाटेसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. ही लाट वेगाने पसरत आहे. संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या महिनाभरात लाखोंच्या घरात जाणार असून मृत्यूचे प्रमाण एक टक्का जरी गृहीत धरले तरी काही हजारांत मृत्यू ओढवतील, अशी भीती आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी राज्यातील जिल्हाधिकाऱयांना पाठवलेल्या पत्रात व्यक्त केल्याचे वृत्त आहे. ओमायक्रोन विषाणूला गांभीर्याने घ्या, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
राज्यात कोरोना विषाणूच्या नव्या रुग्णांमध्ये पुन्हा वाढ होत आहे. राज्यात कोरोनाची तिसरी लाट प्राथमिक अवस्थेत असल्याचे तज्ञांचे मत आहे. मागील चार-पाच दिवसांपासून संसर्ग झालेल्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे.
या पार्श्वभूमीवर राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव (आरोग्य) डॉ. प्रदीप व्यास यांनी सर्व जिल्हाधिकारी आणि आरोग्य अधिकाऱयांना पत्र पाठवली आहेत. तिसऱया लाटेत कोविड संसर्गाची संख्या मोठी असणार आहे. तर तिसऱया लाटेत 80 लाख सक्रिय कोरोना रुग्ण असण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यात मृत्यूचे प्रमाण एक टक्का गृहीत धरले तरी काही हजार मृत्यू होण्याची शक्यता आहे अशी भीती या पत्रात व्यक्त केली आहे.
लसीकरण न झालेल्यांना धोका
या पत्रात डॉ. व्यास यांनी राज्यातील जिल्हास्तरावरील अधिकाऱयांना आवाहन केले आहे की, ओमायक्रोन विषाणूला सहज घेऊ नका तसेच त्यास प्राणघातक समजू नका. ज्यांचे लसीकरण झालेले नाही, ज्यांना गंभीर स्वरूपाचे इतर आजार आहेत त्यांच्यासाठी हा विषाणू तेवढाच घातक आहे. त्यामुळे लसीकरणाला गती द्यावी आणि लोकांचे जीव वाचवावेत, असे या पत्रात म्हटलेले आहे.































































