
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना झाल्याचे निदान झाल्यानंतर केजरीवाल यांनी स्वत:ला इतरांपासून विलग केले आहे. मंगळवारी सकाळी केजरीवाल यांनी एक ट्विट केले असून त्याद्वारे त्यांनी आपल्याला कोरोना झाला असल्याची माहिती दिली आहे. कोरोनाची लक्षणे किरकोळ दिसत असून आपण स्वत:ला विलग केले असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. आपल्या संपर्कात आलेल्यांनीही कोरोनाची चाचणी करून घ्यावी आणि स्वत:ला विलगीकरणात ठेवावे अशी विनंती केजरीवाल यांनी केली आहे.
I have tested positive for Covid. Mild symptoms. Have isolated myself at home. Those who came in touch wid me in last few days, kindly isolate urself and get urself tested
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) January 4, 2022
देश तिसऱ्या लाटेच्या दिशेने
देशात गेल्या 24 तासांत सुमारे 34 हजार कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे देशाची वाटचाल तिसऱ्या लाटेच्या दिशेने सुरू आहे का? अशी शंका उपस्थित होत आहे. दरम्यान, सहा दिवसांत रुग्णवाढीचा वेग सुमारे पाचपट वाढला आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्रालयाच्या आकडेवारीनुसार सोमवारी सकाळी आठपर्यंत देशात 33750 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले. तर, 10846 रुग्ण बरे झाले. 123 रुग्णांचा मृत्यू झाला. 27 डिसेंबरला देशात कोरोनाचे 6358 रुग्ण आढळले होते. त्यामुळे सहा दिवसांत कोरोना रुग्णसंख्येत सुमारे पाचपट वाढ झाली आहे.कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रोनची जगभरात दहशत असतानाच आता ‘फ्लोरोना’चा रुग्ण आढळला आहे. इस्रायलमध्ये एका गरोदर महिलेला ‘फ्लोरोना’ झाला आहे. ‘फ्लोरोना’ म्हणजे कोरोना आणि इन्फ्ल्यूएन्झाचा एकाचवेळी संसर्ग होते. हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट नसल्याचे तज्ञाचे म्हणणे आहे.
50 टक्के कर्मचाऱ्यांनाच कामावर बोलवा, केंद्र सरकारची नवी नियमावली
देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णाची संख्या झपाटय़ाने काढत आहे. त्यातच ओमायक्रॉन व्हेरियंटच्या संसर्गाचं प्रमाणही काढलं आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राकडून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे. सरकारी कार्यालयात 50 टक्के इतकीच कर्मचाऱ्यांची उपस्थिती ठेवण्यात यावी, उर्वरित कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ देण्यात यावे, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.
सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची गर्दी टाळण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामाचे वेळापत्रक ठरवून देऊन फक्त 50 टक्के उपस्थिती ठेवावी. जे कर्मचारी कंटेमेंट झोनमध्ये राहतात, त्यांना कार्यलयात बोलवू नका. दिव्यांग, अपंग कर्मचाऱ्यांनाही कार्यलयात बोलविण्यात येऊ नये. गर्भवती महिलांनाही सूट देण्यात यावी, अशा सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत.




























































