
कोरोना व ओमायक्रोनचा वाढता संसर्ग आटोक्यात न आल्यास देशभर लॉकडाऊन लागू शकतो का? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहे. याच पार्श्वभूमीवर कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. एन. के. अरोरा यांनी मंगळवारी महत्त्वपूर्ण विधान केले. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन लादणे शहाणपणाचे नाही. त्याऐवजी ‘स्मार्ट कंटेंमेंट’ची गरज आहे. जिल्हा पातळीवर काही निर्बंध लावले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
ओमायक्रोनच्या घुसखोरीनंतर देशात गेल्या दोन आठवडय़ांपासून कोरोना संसर्गाचा विस्पह्ट झाला आहे. मागील 24 तासांत 33,379 नवे रुग्ण आढळले आहेत. प्रमुख महानगरांत संसर्गाचा झालेला उद्रेक ही कोरोनाच्या तिसऱया लाटेची सुरुवात असल्याचे डॉ. अरोरा यांनी सोमवारी सांगितले होते. मंगळवारी त्यांनी देशव्यापी लॉकडाऊनच्या शक्यतेवर स्पष्ट मत व्यक्त केले. देशात लॉकडाऊन लावण्यात काहीही अर्थ नाही. त्याऐवजी अत्यंत योग्य पद्धतीने नियोजन करण्याची गरज आहे. अशा ‘स्मार्ट कंटेंमेंट’मुळे वाढत्या संसर्गाची स्थिती नियंत्रणात आणता येईल. जिल्हा पातळीवर काही प्रमाणात निर्बंध लावले जाऊ शकतील, असे त्यांनी नमूद केले.
सध्याच्या लसी ओमायक्रोनपुढे निप्रभ, पण मृत्यू टाळताहेत!
सध्याच्या कोरोना प्रतिबंधक लसी या ओमायक्रोनचा संसर्ग रोखण्यात अपयशी ठरत आहेत, परंतु या लसींचा डोस घेतल्यामुळे रुग्णांच्या मृत्यूचा धोका टळत आहे. बाधित लोक रुग्णालयांत दाखल न होताच बरे होताहेत. देशात ओमायक्रोन व्हेरिएंटवरील औषधाची निर्मिती करण्याचे काम सुरू आहे, असेही डॉ. अरोरा यांनी सांगितले.
डॉ. अरोरा काय म्हणाले?
- कोरोनाची ही तिसरी लाट आहे. गेल्या आठवडाभरात कोरोनाची रुग्णसंख्या तिप्पट झाली आहे. यामागे ओमायक्रोनचा शिरकाव हेच प्रमुख कारण आहे.
- कोरोना रुग्णसंख्या सर्वोच्च बिंदू कधी गाठेल हे आताच सांगता येणे मुश्कील आहे, परंतु येत्या दिवसांत रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढेल.
- मागील काही दिवसांत लोकांचे रुग्णालयांत दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. परंतु देशात आजही 90 ते 95 टक्के कोविड बेड्स रिकामे आहेत.
- ‘डेल्टा’च्या वेळी रुग्णसंख्या वाढली आणि बेडही फुल्ल झाले होते. यावेळेस लक्षणे नसलेले, सौम्य लक्षणांचे तसेच सहव्याधीग्रस्त रुग्ण अधिक आहेत.

























































