एक्साइज अधिकारी आत्महत्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नार्कोटिक्स विभागात कार्यरत असलेले दुय्यम निरीक्षक रमेश मोहिते यांनी मालाड रेल्वे स्थानकात एक्स्प्रेससमोर उडी मारून आत्महत्या केली होती. मोहिते यांच्या आत्महत्याप्रकरणी बोरिवली रेल्वे पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

रमेश मोहिते हे राज्य उत्पादन शुल्क विभागात (एक्साइज) उपनिरीक्षक नार्कोटिक्स विभागातल्या अफिम डेपोमध्ये काम करत होते. 20 डिसेंबरला मोहिते हे नेहमीप्रमाणे कामावर निघाले. दुपारी मोहितेंनी मालाड रेल्वे स्थानकात एक्प्रेससमोर उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्येची माहिती समजताच बोरिवली रेल्वे पोलीस घटनास्थळी गेले. घटनास्थळी पोलिसांना एक मोबाईल आणि सुसाईड नोट सापडली. बोरिवली रेल्वे पोलिसांनी मोहिते यांच्या कुटुंबीयांना फोन करून त्याच्या आत्महत्येची माहिती दिली. पोलिसांनी मोहिते यांच्या पत्नीचा नुकताच जबाब नोंदवला आहे.

मोहिते यांनी आत्महत्येपूर्वी दोन चिठ्ठय़ा लिहिल्या होत्या. एका चिठ्ठीत त्यांनी आयुक्त कार्यालयात काम करणाऱया एका लिपिकाचे नाव लिहिले आहे. तो व्यक्ती मानसिक छळ करत असल्याने आपण आत्महत्या करत असल्याचे मोहिते यांनी त्या चिठ्ठीत लिहिले होते. तर दुसऱया चिठ्ठीत संभाजीनगर येथे बदलीसाठी एका अधिकाऱयाला 33 लाख रुपये दिले होते. पैसे देऊनदेखील बदली झाली नव्हती. बदलीसाठी मोहिते यांनी नातेवाईकांकडून कर्ज आणि सोन्याचे दागिने, वाहन विकून पैसे जमा केले होते. ते पैसे उत्पादन शुल्क ‘पी’ विभागात काम करणाऱया एका अधिकाऱयाला दिले होते. पैसे देऊनदेखील बदली न झाल्याने मोहिते हे चिंतेत असायचे असे त्यांच्या पत्नीने पोलिसांना जबाबात सांगितले. मोहिते यांच्या पत्नीने दिलेल्या जबाबावरून बोरिवली रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

आमच्या विभागातील उपनिरीक्षकाने आत्महत्या केली. बोरिवली रेल्वे पोलिसांनी सुरुवातीला अपमृत्यूची नोंद करून तपास सुरू केला. या प्रकरणात रीतसर अहवाल आल्यावर कार्यवाही केली जाईल. – कांतीलाल उमाप, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क विभाग