बुल्ली बाई प्रकरण, उत्तराखंड येथून आणखी एका इंजिनीअरला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बुल्ली बाई प्रकरणात मुंबई सायबर पोलिसांनी नुकतीच श्वेता सिंहला अटक केल्यानंतर उत्तराखंड येथून मयांक रावत नावाच्या तरुणाला अटक केली. मयांकला ट्रान्झिट रिमांडवर मुंबईत आणले जात आहे. श्वेता सिंह ही क्रिएटर असून तिने ट्विटरवर ‘बुल्ली बाई’ नावाचे अकाऊंट उघडले होते. तर खालसा सुपरमेसिस्ट या ट्विटर हॅण्डलवर कॅनडाचे लोकेशन दाखवून ही टोळी नाव बदलून ट्विट करत असल्याची माहिती समोर आली आहे. मयांकच्या अटकेने अटक आरोपींची संख्या आता तीन झाली आहे.

सोशल मीडियावर मुस्लिम समाजातील महिलांचे फोटो अपलोड करून त्याची बदनामी केली जात होती. घडल्याप्रकरणी मुंबई सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. या गुह्याची उकल केल्याबाबत मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. ‘बुल्ली बाई’ ट्विटर हॅण्डलवर कोण फॉलोअर्स आहेत याची माहिती काढली. त्यावरून पोलिसांनी बंगळुरू येथून विशालला आणि उत्तराखंड येथून श्वेता सिंह आणि मयांक रावतला ताब्यात घेतले. नुकतीच पोलिसांनी श्वेता सिंहला अटक केली होती. तिच्या अटकेनंतर आज पोलिसांनी मयांकला उत्तराखंड येथून ताब्यात घेऊन अटक केली. श्वेता ही क्रिएटर असून तिने ट्विटरवर ‘बुल्ली बाई’चे हॅण्डल केले होते. तर बुल्ली बाईचे ऍप नेमके कोणी तयार केले याबाबत पोलीस विशाल आणि मयांककडे चौकशी करत आहेत.

तपासादरम्यान बुल्ली बाई ऍपला ट्विटरवर फॉलो करणाऱया हरपाल सीख-खालसा, सेज @ सेज, खालसा सुपरमसीव आणि जतिनदर सिंग गुल्लर या फॉलोअर्सची माहिती पोलिसांना मिळाली आहे. हे वादग्रस्त ऍप कटाचा भाग असून शकतो. त्यामुळे याची सखोल चौकशी केली जात असल्याचे आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितले. पोलिसांना काही ई-मेल आयडी हाती लागले आहेत. त्यावरून पोलीस पुढील तपास करत आहेत. अशा घटना पुन्हा घडू नये म्हणून खबरदारी घेतली जात आहे. ज्या नागरिकांना या ऍपबाबत माहिती द्यायची असेल त्यांनी सायबर पोलिसांनी संपर्क साधण्याचे आवाहन नगराळे यांनी केले.

विशालचे होते यूटय़ूब चॅनल्स

इंजिनीअरिंगच्या दुसऱया वर्षात असलेल्या विशाल झाचे स्वतःचे यूटय़ूब चॅनल्स असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचे ते चॅनल्स कधीपासून सुरू होते, त्याने त्या चॅनल्सवर कोणता मजकूर दाखवला होता. विशालला चॅनल्सच्या मोबदल्यात काही पैसे मिळाले होते का याचा तपास पोलीस करणार आहेत. आरोपीकडून पोलिसांनी मोबाईल, सीमकार्ड आणि लॅपटॉप जप्त केला आहे.

  • विशाल हा स्वतःच मोबाईलवर मजकूर अपलोड करायचा.
  •  बुल्ली बाई ऍप्स तयार करण्यासाठी गीटहब या प्लॅटफॉर्मचा वापर करण्यात आला.
  •  शीख धर्मीयांशी संबंधित शब्दाचा वापर करून मुस्लिम महिलांना केले जात होते टार्गेट.