पंतच्या खराब फॉर्ममुळे टीम इंडिया चिंतेत, 83 वर्ल्डकप विजेत्या अष्टपैलूने दिला मोलाचा सल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराच्या खराब फॉर्मची चर्चा सुरू असतानाच आता यात ऋषभ पंतच्या नावाचीही भर पडली आहे. पंत देखील गेल्या काही काळापासून खराब कामगिरी करत आहे. तसेच बेजबाबदारपणे विकेट फेकण्याच्या त्याच्या सवयीमुळे टीम इंडिया चिंतेत आहे.

जोहान्सबर्गमध्येही ऋषभ पंत याने खराब फटका मारला आणि तो बाद झाला. रहाणे-पुजाराने शतकीय भागिदारी केल्यानंतर खरे तर पंतकडे जबाबदारीने खेळण्याची संधी होती. मात्र त्याने चुकीचा फटका मारला आणि टीम इंडियाने मोठी आघाडी घेण्याची संधी गमावली. पंतच्या विकेटमुळे दक्षिण आफ्रिकेला कमबॅकची संधी मिळाली आणि यजमान संघाने हा सामना 7 विकेट्सने जिंकला.

पंतने विकेट फेकल्याने माजी कॅप्टन आणि समालोचक सुनिल गावस्कर यांचाही पारा चढला. त्यांनी पंतवर टीका केली. आता वर्ल्डकप विजेत्या संघातील माजी अष्टपैलू खेळाडू मदन लाल यांनीही पंतच्या खराब फॉर्मवर आपले मत व्यक्त केले आहे. पंतला आराम देण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.

यष्टीवर चेंडू आदळूनही फलंदाज नाबाद, हा गोलंदाजावर अन्यायच!

1983 वर्ल्डकप विजेत्या संघाचे सदस्य मदन लाल यांनी ऋषभ पंत याला टेस्टमधून विश्रांती देण्याचा सल्ला दिला आहे. पंतला टेस्टमध्ये कशी फलंदाजी करायला हवी हे ठरवावे लागेल. तुम्ही भले कितीही मोठे मॅचविनर असाल परंतु असे बेजबाबदार फटका मारू शकत नाही, असे मदन लाल म्हणाले. तसेच टीम इंडियाकडे ऋद्धिमान सहासारखा समजूतदार फलंदाज आणि यष्टीरक्षक आहे, असे म्हणत पंतला आराम देऊन त्याला संधी देण्याचा सूचक इशाराही केला.