
कलाक्षेत्रात मूर्ती कलेला खूप महत्त्व आहे, तरी गणेशमूर्ती घडवणारे हात मात्र कायम मागे राहिले आहेत. अशा गणेश मूर्तिकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांची कला रसिकांपर्यंत पोचावी, यासाठी गणेश मूर्तिकारांचे अनोखे प्रदर्शन मुंबईत आयोजित करण्यात आले आहे. राज्यभरातील 60 हून अधिक मूर्तिकार आकर्षक आणि कल्पक गणेशमूर्तींसह या प्रदर्शनात सहभागी झाले आहेत. एखाद्या आर्ट गॅलरीत अशा पद्धतीने प्रथमच गणेशमूर्तींचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. त्याला कलाप्रेमींचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.
श्री गणेश मूर्तिकार कामगार संघटना, महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने ‘गणांक’ हे गणेशमूर्ती प्रदर्शन वांद्रे येथील द बॉम्बे आर्ट सोसायटीमध्ये आयोजित करण्यात आले आहे. या कलादालनात मूर्तिकाम या पारंपरिक कलेसाठी दालन उपलब्ध करून देण्यात आले आहे. अनोख्या संकल्पना, विचार यातून साकारलेल्या गणरायाची नाना रूपं प्रदर्शनात पाहावयास मिळत आहेत. तीन दिवसीय प्रदर्शन 9 जानेवारीपर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 7 या वेळेत रसिकांना बघता येईल.
गणांक प्रदर्शनात शनिवारी, 8 जानेवारी रोजी मूर्तिकार विशाल शिंदे, आतिश पालवणकर, विजय माटावकर यांनी मूर्तीचे प्रात्यक्षिक दाखवले, तर रविवारी, 9 जानेवारी रोजी माती आणि पीओपी या विषयावर परिसंवाद होणार आहे. तसेच संदीप सिद्धये यांचे गणपतीविषयक व्याखान होईल.
दिवंगत ख्यातनाम मूर्तिकार दीनानाथ वेलिंग, विजय खातू, दुष्यंत हटकर, मनोहर शेडगे यांच्या कुटुंबीयांचा यावेळी सत्कार करण्यात आला. गिरगावचे ज्येष्ठ मूर्तिकार श्रीधर कोरगावकर, वय वर्षे 101 यांना गणगौरव 2022 पुरस्कार देण्यात आला. कोरगावकर यांच्या वतीने त्यांच्या नातेवाईकांनी पुरस्कार स्वीकारला.



























































