
संगीत रंगभूमीच्या सुवर्णयुगाचे साक्षीदार, ज्येष्ठ गायक, अभिनेते पंडित रामदास कामत यांचे शनिवारी रात्री वृद्धापकाळाने विलेपार्ले येथील घरी निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. ‘मत्स्यगंधा’, ‘ययाति आणि देवयानी’ या नाटकांतील त्यांची भूमिका आणि नाटय़पदे अजरामर झाली. रंगभूमीशी त्यांचे जुळलेले ‘हे बंध रेशमाचे’ अखेरपर्यंत कायम राहिले. केवळ नाटय़संगीतच नव्हे तर भावगीत, चित्रपट संगीतावरही त्यांनी छाप उमटविली. त्यांच्या निधनाने रंगभूमीचे अनमोल रत्न हरपले, अशी हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिवावर अंधेरी स्मशानभूमीत आज सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा डॉ. काwस्तुभ कामत, सून डॉ. संध्या कामत आणि नातू, नातसून असा परिवार आहे.
रामदास कामत यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1931 रोजी गोव्यात म्हापसा येथे झाला. त्यांनी लहानपणापासून वडील बंधू उपेंद्र यांच्याकडून संगीताचे धडे गिरवले. पंडित गोविंद बुवा अग्नी, पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे त्यांनी नाटय़संगीत धडे घेतले तर त्यांचे अभिनय क्षेत्रातील गुरू नटश्रेष्ठ गोपीनाथ सावकार होते. संगीताचा गाढा अभ्यास केलेल्या पंडित रामदास कामत यांनी धि गोवा हिंदू असोसिएशनच्या ‘संगीत संशयकल्लोळ’ या नाटय़ स्पर्धेच्या नाटकाने आपल्या संगीत रंगभूमीवरील कारकीर्दीची सुरुवात केली होती.
अर्थशास्त्र्ााचे पदवीधर असलेले कामत नोकरी सांभाळून आकाशवाणीवर गात आणि संगीत नाटकांत कामे करत. 1964 साली आलेल्या ‘मत्स्यगंधा’ नाटकाने कामत यांचे नाव घराघरांत पोहोचले आणि पुढे ते गायक अभिनेते म्हणूनच प्रसिद्धीस आले. पाठोपाठ नाटक ‘ययाती देवयानी’ आले आणि ‘सर्वात्मका सर्वेश्वरा…’ ही त्यांची प्रार्थना अजरामर झाली. पुढे ‘धन्य ते गायनी कळा’, ‘मीरामधुरा’, ‘हे बंध रेशमाचे’ अशा अनेक नाटकांतील त्यांच्या भूमिका व पदे गाजली.
रामदास कामत यांनी ‘एकच प्याला’, ‘कान्होपात्रा’, ‘धन्य ते गायनी कळा’, ‘मदनाची मंजिरी’, ‘मानापमान’, ‘मीरा मधुरा’, ‘मृच्छकटिक’, ‘शारदा’, ‘संन्याशाचा संसार’, ‘सौभद्र’, ‘स्वरसम्राज्ञी’, ‘होनाजी बाळा’ आदी संगीत नाटकांतून कामे केली. ही सर्व नाटके आणि त्यातील गाणी गाजली. पण त्यातही ‘मत्स्यगंधा’ व ‘ययाति आणि देवयानी’ या नाटकांनी त्यांना सर्वाधिक लोकप्रियता मिळवून दिली. ‘मत्स्यगंधा’ नाटकात त्यांनी ‘पराशर’ तर ‘ययाति आणि देवयानी’ नाटकात ‘कच’ या भूमिका साकारल्या. या दोन्ही नाटकांतील ‘गुंतता हृदय हे कमलदलाच्या पाशी’, ‘देवाघरचे ज्ञात कुणाला’, ‘नको विसरू संकेत मीलनाचा’, ‘साद देती हिमशिखरे’ तसेच ‘तम निशेचा सरला’, ‘प्रेम वरदान स्मरत राहा’ ही त्यांची पदे गाजली. कामत यांनी गायलेली ‘अंबरातल्या निळ्या घनांची शपथ तुला आहे’, ‘जन विजन झाले’, ‘बहुत दिनी नच भेटलो सुंदरीला’, ‘श्रीरंगा कमला कांता’ ही गाणीही रसिकांच्या स्मरणात आहेत.
भावगीत, चित्रपट गीते गाजली
‘मुंबईचा जावई’ या चित्रपटासाठी त्यांनी गायलेल्या ‘प्रथम तुज पाहता जीव वेडावला’ या गाण्याची लोकप्रियता आजही तसूभर कमी झालेली नाही. त्यांनी गायलेली ‘आकाशी फुलला चांदण्यांचा मळा’, ‘देवा तुझा मी सोनार’, ‘निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे’, ‘पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव’, ‘वाटे भल्या पहाटे यावे’, ‘हे आदिमा हे अंतिमा’, ‘विनायका हो सिद्ध गणेशा’, ‘हे गणनायक सिद्धिविनायक’, ‘हे शिवशंकर गिरिजा तनया’ आदी भावगीते, चित्रपट गीतेही लोकप्रिय आहेत.
संगीत रंगभूमीचा सच्चा साधक पडद्याआड, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्रद्धांजली
संगीत रंगभूमीचा सच्चा साधक काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ गायक, अभिनेते पंडित रामदास कामत यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धाजंली वाहिली. आपल्या शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणाले, मराठी संगीत रंगभूमीचा सच्चा साधक म्हणता येईल अशी त्यांची कला कारकीर्द होती. त्यांनी आपल्या या कलासाधनेचा आदर्शच नव्या पिढीला घालून दिला आहे.
































































