पंतप्रधानांच्या सुरक्षेत त्रुटी, सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यातील सुरक्षा त्रुटीसंबंधी सर्वोच्च न्यायालय उद्या, सोमवारी सुनावणी घेणार आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांनी शुक्रवारी याचिकेची दखल घेताना पंजाब आणि केंद्र सरकारच्या स्वतंत्र समित्यांचे काम थांबवले होते. त्यामुळे न्यायालय स्वतः या प्रकरणात नवीन समिती नेमणार की काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यासंदर्भात ‘लॉयर्स व्हॉइस’ या संघटनेने याचिका दाखल केली आहे. त्यावर सोमवारी सरन्यायाधीश रमण्णा यांच्या नेतृत्वाखाली न्यायमूर्ती सूर्या कांत आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 5 जानेवारीला पंजाब दौऱ्यावर गेले होते. भटिंडा विमानतळावर उतरून ते फिरोजपूरच्या प्रचारसभेसाठी रस्तेमार्गाने चालले होते. याचदरम्यान महामार्गावरील शेतकऱ्यांच्या ‘रास्ता रोको’मुळे त्यांचा ताफा 20 मिनिटे उड्डाणपुलावर खोळंबला होता. ही पंतप्रधानांच्या सुरक्षेतील गंभीर त्रुटी असल्याचा दावा करीत ‘लॉयर्स व्हॉइस’ संघटनेने याचिका दाखल केली आहे.