
देशात पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली. यात सर्वाचे लक्ष लागलेल्या पंजाब आणि उत्तर प्रदेशमध्ये भाजपला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. एबीपी न्यूजने सी-वोटर सर्व्हेच्या माध्यमातून जाणून घेतलेल्या ओपिनियन पोलमध्ये पंजाबमध्ये आप बाजी मारणार असल्याचे दिसत आहे, तर उत्तर प्रदेशात भाजपची सत्ता येणार असली तरी मागच्या वेळीच्या तुलनेत त्यांचे 100 जागांचे नुकसान होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. गोव्यात पुन्हा भाजपची सत्ता येण्याचा अंदाज असून उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये मात्र भाजपला कॉँग्रेसशी अटीतटीचा सामना करावा लागणार आहे. हा सर्व्हे 12 डिसेंबर ते 8 जानेवारी दरम्यान घेण्यात आला आहे.
पंजाबमधील शेतकऱयांच्या प्रचंड विरोधामुळे केंद्रातील सत्ताधारी भाजपला अन्यायकारक कृषी कायदे मागे घ्यावे लागले. तर पंजाबमधील सत्ताधारी कॉँग्रेसला पक्षांतर्गत वादामुळे नेतृत्वात बदल करावा लागला. यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत काय होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. एबीपी न्यूजने सी-वोटरच्या माध्यमातून केलेल्या सर्वेक्षणात येथे मुख्य लढत ही आप आणि काँग्रेसमध्येच असल्याचं दिसून येतंय. आप सत्तेत येण्याची शक्यता असून कॉँग्रेस दुसऱया, अकाली दल तिसऱया, तर भाजप चौथ्या क्रमांकावर राहण्याचा अंदाज आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा फटका हा पंजाबमध्ये भाजपला बसणार असल्याच दिसतंय.
उत्तर प्रदेशमध्ये भाजप विरुद्ध सपा लढत
उत्तर प्रदेशमध्ये सध्यातरी उत्तर प्रदेशची निवडणूक ही भाजप विरुद्ध समाजवादी पक्ष अशीच लढत दिसत आहे. गेल्या निवडणुकीत भाजपला येथे एकहाती सत्ता मिळाली होती. या ओपिनियन पोलमध्ये भाजपला 223 ते 235 जागा मिळण्याची शक्यता असून जवळपास 100 जागांचे नुकसान होणार आहे. सपाला 145 ते 157 जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला केवळ 3 ते 7 जागांवर समाधान मानावं लागेल. मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ यांना 43 टक्के तर अखिलेश सिंह यांना 34 टक्के पसंती दिली आहे. 14 लोकांनी मायावती तर 4 टक्के लोकांनी प्रियंका गांधींना पसंती दिली आहे.
पंजाबमध्ये ‘आप’ला 52 ते 58 जागा
पंजाबमध्ये ‘आप’ला 52 ते 58 जागा मिळण्याची शक्यता आहे तर काँग्रेसला 37 ते 43 जागा मिळण्याची शक्यता आहे. अकाली दलाला 17 ते 23 आणि भाजपला केवळ 1 ते 3 जागा मिळण्याची शक्यता सर्व्हेमध्ये वर्तवण्यात आली आहे. कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा पक्ष भाजपसोबत युती करून निवडणुकीत उतरला असला तरी त्याचा फारसा फायदा होताना दिसत नाही. मुख्यमंत्री म्हणून कॅप्टन अमरिंदर सिंह यांना 6 टक्के जनता पसंत करत आहे. सुखबीर सिंह बादल यांना 15 टक्के, अरविंद केजरीवाल 17 टक्के, चरणजीत सिंह चन्नी 29 टक्के, भगवंत मान 23 टक्के पसंती आहे.
उत्तराखंडमध्ये भाजप-कॉँग्रेसमध्ये अटीतटी
उत्तराखंडमध्ये 2017 सालच्या निवडणुकांमध्ये जनतेने भाजपच्या बाजूने कौल दिला होता. यावेळी मात्र येथे सत्ताधारी भाजप आणि कॉँग्रेसमध्ये अटीतटीचा सामना होताना दिसत आहे. भाजपला 31 ते 37 जागा तर कॉँग्रेसला 30 ते 36 जागा मिळतील असा अंदाज आहे. आम आदमी पक्षाला 2 ते 4 जागा तर अपक्षांच्या वाटय़ाला एक जागा जाईल, असा अंदाज आहे.
गोव्यात पुन्हा भाजप
गोव्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वात भाजप सत्ता राखेल असा अंदाज वर्तविण्यात आला असून भाजपला 2017 च्या तुलनेत 8 जागांचा फायदा होणार आहे. भाजपला 19 ते 30, आप 5 ते 9, काँग्रेस 4 ते 8, मगोप 2 ते 6 तर इतर पक्षांना चार जागा मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री म्हणून प्रमोद सावंत यांना 34 टक्के. तर आपचे उमेदवार 19 टक्के, भाजपचे विश्वजीत राणे 16 टक्के, काँग्रेसचे दिगंबर कामत यांना 9 टक्के पसंती मिळाली आहे.
मणिपूरमध्ये कॉँग्रेसचा वनवास संपणार?
मणिपूरमधील अंदाज सर्वांसाठीच आश्चर्यकारक असून सत्ताधारी भाजपला धक्का देत कॉँग्रेसचा वनवास संपणार का? याची उत्सकुता आहे. विधानसभेच्या 60 जागांपैकी भाजपला 23 ते 27, काँग्रेस 22 ते 26, एनपीएफ 2 ते 6, इतर 5 ते 9 जागा जिंकण्याची शक्यता आहे.




























































