
कॅण्टोन्मेंट हद्दीतून प्रवास करणाऱया व्यावसायिक वाहनांकडून वाहन प्रवेश शुल्क आकारणे थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी वाहन शुल्क (फी) आकारणाऱया देशातील कॅण्टोन्मेंट बोर्ड हद्दीत सुरू झाली आहे. मात्र, भिंगार कॅण्टोन्मेंट हद्दीत प्रवेश कर आकारला जात असल्याने सदरचा आदेश या ठिकाणी लागू होत नसल्याचे सांगण्यात आले आहे.
संरक्षण मालमत्ता विभागाचे सहायक महासंचालक (कॅण्टोन्मेंट) दमण सिंग यांनी याबाबतचे पत्र संबंधितांना पाठविले आहे. कॅण्टोन्मेंट कायदा 2006 नुसार वाहन प्रवेश शुल्क आकारणी केली जात होती. जीएसटी लागू झाल्यानंतर कॅण्टोन्मेंट बोर्डाकडून एलबीटीसह वाहन प्रवेश शुल्काची आकारणी बंद करण्यात आली आहे. या भागातून व्यावसायिक वाहनांकडून 20 ते 70 रुपये प्रवेश शुल्काची आकारणी केली जात होती. मात्र, संरक्षण मालमत्ता विभागाने वाहन प्रवेश शुल्काची आकारणी बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. पुणे, खडकी, देहूरोड या कॅण्टोन्मेंट बोर्डासह अन्य ठिकाणी त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. भिंगार कॅण्टोन्मेंट बोर्ड येथे वाहनकराची आकारणी केली जाते. त्यामुळे भिंगार कॅण्टोन्मेंट हद्दीत ही वाहन कर आकारणी सुरूच राहणार आहे.





























































