
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली नियमावली भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मान्य नसेल तर आम्ही केंद्र सरकारला तसे कळवू, असा खोचक टोला ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.
राज्य सरकारने निर्बंध घालताना विरोधी पक्षाला विश्वासात घेतले नसल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला होता. या संदर्भात पत्रकारांनी विचारले असता, मंत्री मुश्रीफ बोलत होते.
हसन मुश्रीफ म्हणाले, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून सुरू असलेल्या निर्बंधाची अंमलबजावणी हे केंद्र सरकारने दिलेल्या नियमावलीप्रमाणे आहेत. त्यामुळे केंद्र सरकार म्हणजे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जारी केलेली नियमावलीच चंद्रकांत पाटील यांना मान्य नसेल तर आम्ही केंद्र सरकारला तसे कळवू, असेही ते म्हणाले.
काही दिवसांपासून कोरोना संसर्गाचा जोर पाहाता राज्यात मध्यरात्रीपासून नव्याने कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्य विभाग, टास्क फोर्स आणि इतर यंत्रणांबरोबरील बैठकीनंतर या निर्बंधांची घोषणा केल्याचे हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
रुग्णसंख्येचा वाढता आलेख पाहाता महाराष्ट्रातील सर्व गावांत ग्रामसमिती पुन्हा कार्यान्वित करण्यात येत आहे. शहरी तसेच परदेशातून येणाऱया प्रत्येक नागरिकाची नोंद व त्यांच्यावर लक्ष या ग्रामसमितीमार्फत ठेवले जाणार असल्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले आहे. तसेच, फ्रंटलाइन वर्कर आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सोमवारपासून सुरू केलेल्या बुस्टर लसीकरणाचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

























































