
>> मयूर प्रकाश ढोलम
कोरोना कोरोना कोरोना… गेला, संपला, कमी झाला म्हणता म्हणता पुन्हा आला तिसऱया लाटेत आणि लोकांना पुन्हा ताळेबंदी की कडक निर्बंध, नवीन नियमावली, सगळाच गोंधळ, पण लोकांनी काही नियम पाळणे गरजेचे आहेच. तोंडावर मास्क लावणे फार गरजेचे आहे. माणसामाणसात अंतर ठेवल्यामुळे विषाणूचा संसर्ग पसरणार नाही. निर्बंध उठल्यानंतर नोकरी धंदा करणाऱयापेक्षा बिनकामाचेच जास्त बाहेर फिरताना दिसतात आणि मग गर्दी वाढते. आता गरज आहे सरकारी यंत्रणा, महानगरपालिका कर्मचारी, डॉक्टर, पोलीस आणि नोकरी करता बाहेर निघणारे कर्मचारी यांनाच मुभा द्यावी. कारण शाळा-महाविद्यालये शासनाने बंद केली आहेत, मग त्या विद्यार्थ्यांनी उगाच बाहेर फिरू नये आणि पोलिसांत कोरोना वाढला म्हणून 55 वर्षांच्या वरच्या पोलिसांना घरीच काम करण्याची मुभा दिली. तसे इतर क्षेत्रात काम करणाऱया 55 पुढील कर्मचारी आणि काही ज्येष्ठ नागरिकांनाही द्यावी. रस्त्यावर अनावश्यक खरेदी लोकांनी स्वतः टाळावी आणि गर्दी कमी करण्यासाठी शासनाला मदत करावी.
सगळ्यात महत्वाचे हात साबणाने धुणे, सॅनिटायझर वापरणे हे तर मार्च 2020 पासून लोकांनी सुरूच ठेवले आहे आणि यापुढे कायमस्वरूपीच सुरू ठेवायचे आहे. त्यामुळे अनेक विषाणूंना आपल्यापासून दूर ठेवता येते आणि संरक्षण मिळवता येते. शासनाने फक्त या जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती थोडय़ा नियंत्रणात ठेवायला हव्या. रेशन दुकानात तांदूळ मोफत दिले तशा थोडय़ा फार प्रमाणात मोफत दिल्या तरी चालतील. मार्च 2020 कोरोना विषाणू आणि त्यानंतर ताळेबंदी, निर्बंध, नियम आणि एक नवा विषाणू. लोकांनी मोकळा श्वास घ्यायचा कधी? आज एकवीस महिने उलटले, कित्येक लोकांचे लसीकरण झाले आणि आता पुन्हा तिसरी लाट. त्यात लोकांना भीती ताळेबंदीची आहे.




























































